सांगलीत रस्ते हस्तांतरणाविरोधात पायताण मोर्चा
By admin | Published: May 20, 2017 06:53 PM2017-05-20T18:53:24+5:302017-05-20T18:53:24+5:30
रस्ते हस्तांतरणाविरोधात महापालिकेचा, नगरसेवकांचा निषेध करीत, शनिवारी स्वाभिमानी विकास आघाडी, शहर सुधार समिती, मनसे यांच्यावतीने महापालिकेवर पायताण मोर्चा काढण्यात आला.
Next
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 20 - रस्ते हस्तांतरणाविरोधात महापालिकेचा, नगरसेवकांचा निषेध करीत, शनिवारी स्वाभिमानी विकास आघाडी, शहर सुधार समिती, मनसे यांच्यावतीने महापालिकेवर पायताण मोर्चा काढण्यात आला. नगरसेवकांविरोधात निषेधाच्या घोषणा देत बांगड्याही भेट म्हणून प्रवेशद्वाराला बांधण्यात आल्या. सांगलीच्या मित्रमंडळ चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. कापड पेठ, हरभट रोडमार्गे महापालिकेवर मोर्चा आला. याठिकाणी रस्ते हस्तांतरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दारू दुकानांसोबत तडजोड करणा-या नगरसेवकांचा निषेधही करण्यात आला. निदर्शने करून महिलांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराला बांगड्या बांधल्या. प्रवेशद्वार बंद करण्यात आल्यामुळे नगरसेवक, अधिका-यांना मागील दाराने महापालिकेत जावे लागले.
यावेळी नगरसेवक शेखर माने म्हणाले की, आमच्या आंदोलनाने ब-याचजणांची अडचण झाली आहे. जनतेची दारूबंदीची भावना असताना, काही पदाधिकारी आणि नगरसेवक रस्ते हस्तांतरण करून दारूवाल्यांना रान मोकळे करून देण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडू.
स्वाभिमानी विकास आघाडीचे नगरसेवक गौतम पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सत्तेचा गैरवापर करीत काही नगरसेवक ऐनवेळी ठराव करण्याच्या प्रयत्नात आहेत. जोपर्यंत आम्ही सभागृहात आहोत, तोपर्यंत त्यांचे हे उद्योग चालू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत पुन्हा दारू दुकाने सुरू होऊ देणार नाही.
मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत म्हणाले की, "राज्यात सर्वाधिक बदनाम झालेली ही महापालिका आहे. अनेक घोटाळे याठिकाणी घडले. जनतेच्या पैशाची वाट लावली गेली. आता यात रस्ते हस्तांतरणाच्या माध्यमातून ते भर टाकत आहेत".
आंदोलनात उपमहापौर विजय घाडगे, सतीश साखळकर, मनसेचे अशिष कोरी, शहर सुधार समितीचे रवींद्र चव्हाण आदी सहभागी झाले होते.
फटाक्यांची आतिषबाजी
महासभेत रस्ते हस्तांतरणाचा ठराव झाला नसल्याचे गौतम पवार व शेखर माने यांनी आंदोलकांसमोर स्पष्ट केल्यानंतर महापालिकेसमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.