जातपंचायतीने घेतला पित्याचा बळी

By admin | Published: November 21, 2015 01:46 AM2015-11-21T01:46:49+5:302015-11-21T02:05:50+5:30

समाजातून केले बहिष्कृत, पाच लाखाचा दंड ठोठावल्यामुळे ह्रदयविकाराचा झटका.

Pip victim of Jatapanchi | जातपंचायतीने घेतला पित्याचा बळी

जातपंचायतीने घेतला पित्याचा बळी

Next

विवेक चांदूरकर/ वाशिम : मुलीच्या गैरकृत्याबद्दल पित्याला समाजातून बहिष्कृत करून, पाच लाखाचा दंड ठोठावणार्‍या नाथजोगी समाजाच्या जात पंचायतीच्या निर्दयी कृत्याने या पित्याचा बळी घेतला. तब्बल पाच लाखांचा दंड आणि समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी, यामुळे दबावाखाली आलेल्या ग्रामस्थाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. जात पंचायतीच्या आदेशामुळे या दुर्दैवी पित्याच्या अंतिम संस्कारासही कुणी गेले नाही, हे विशेष. रिसोड तालुक्यात गणेशपुर हे एक छोटेसे गाव असून, येथे नाथ जोगी समाजाचे लोक वास्तव्य करतात. शेती करून कुटुंबाचा उदहनिर्वाह भागविणार्‍या सुभाष सावंत यांच्या मुलीचा विवाह गावातीलच साईनाथ शितोडे यांच्यासोबत तीन वर्षापूर्वी झाला. लग्नानंतर दोन वर्षे तिला अपत्य झाले नाही. त्यामुळे संसारात कुरबूर सुरू होती. त्यानंतर पत्नी गरोदर राहीली; मात्र पतीने हा गर्भ आपला नसल्याचा संशय घेऊन तिला माहेरी पाठविले. यानंतर त्याने या प्रकाराची तक्रार मालेगाव तालुक्यातील कोल्ही येथील जात पंचायतीचे प्रमुख बापू चिमाजी सेगर यांच्याकडे केली. सेगर यांनी या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी पंचायत बोलविण्यात आली. त्याचे निमंत्रण सुभाष यांनाही मिळाले; मात्र काही गडबड होईल या भितीने ते पंचायतीला गेले नाही. सुभाष सावंत यांच्या मुलीने गैरव्यवहार केल्यामुळे तिने गर्भपात करून घ्यावा, असा निर्णय यावेळी पंचांनी दिला. तद्वतच, मुलीचा गैरव्यवहार आणि पंचायतीत अनुपस्थिती, या कारणांमुळे सुभाष सावंत यांना समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णयही यावेळी पंचांनी घेतला. समाजात परत यायचे असेल, तर त्यांनी पाच लाख रूपयांचा दंड भरावा, असे फर्मान पंचांनी सोडले. शिवाजी सेगर यांनी गणेशपूर येथे जाऊन सुभाष यांना हा निरोप दिला. नाथ जोगी समाजात पंचायतीला विशेष महत्व असून, समाजातून बहिष्कृत करण्यात आल्याचे शल्य सुभाष यांच्या मनाला बोचले. थोड्या-थोडक्या शेतीतून कुटुंबाचे पालनपोषण करीत असताना दंड भरण्यासाठी पाच लाख रूपये कुठून आणावे, हा प्रश्न त्यांना पडला. या विवंचनेत ६ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. जात पंचायतीची निर्दयता एवढय़ावर थांबली नाही. सुभाषच्या अंतिम संस्कारात कुणीही जाऊ नये, असे फर्मान पंचायतीने सोडले. त्यामुळे घरची मंडळी आणि नातेवाईकांनाच अंतिम संस्कार उरकावे लागले. पोलीसही याप्रकरणी कारवाई करण्यास तयार नसल्याने मृताचे कुटुंब प्रचंड दडपणात आहे.

**आत्महत्या हाच पर्याय

           जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केले आहे. पोलीस दखल घेण्यास तयार नाहीत. तक्रार दिल्यावरही कारवाई झाली नाही. आता जातीबाहेर कसे वास्तव्य करावे, मुलांचे विवाह कसे करावे, पंचायतीतील लोक सुखाने जगू देणार नाही, अशी भीती सुभाष यांच्या आई- वडिलांना असून, अशा स्थितीत आमच्यापुढे आता आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Pip victim of Jatapanchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.