तरुणीच्या कानशिलावर पिस्तूल लावले
By admin | Published: July 22, 2016 06:46 AM2016-07-22T06:46:29+5:302016-07-22T06:46:29+5:30
तरुणीच्या कानशिलावर पिस्तूल लावून तिला दोघांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याची खळबळजनक घटना खामला परिसरात गुरुवारी रात्री घडली.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 22 - तरुणीच्या कानशिलावर पिस्तूल लावून तिला दोघांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याची खळबळजनक घटना खामला परिसरात गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी प्रतापनगर ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
संचिता राऊत असे पीडित तरुणीचे नाव आहे. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास ती एका मैत्रीणीसह खामला बाजारात भाजीपाला घेण्यासाठी जात होती. अचानक तिच्या बाजुला एक कार थांबली. आतमधील तीन पैकी दोन तरुण आले. त्यातील एकाने संचिताचे केस धरून तिच्या कानशिलावर पिस्तूल लावले. शिवीगाळ करून धमकी दिली. हे पाहून संचिताची मैत्रीण ओरडली. त्यामुळे आजूबाजूच्या मंडळीचे लक्ष वेधले गेले. गडबड होऊ शकते हे ध्यानात आल्याने आरोपी तरुण आपल्या कारमध्ये बसून पळून गेले. या घटनेची माहिती पीडित तरुणीने राष्टवादी काँग्रेसच्या पदाधिकारी नूतन रेवतकर यांना दिली. त्यांनी लगेच तरुणींना घेऊन प्रतापनगर ठाणे गाठले. पोलिसांनी परत तरुणींसोबत घटनास्थळ गाठले. पाहाणी केल्यानंतर मध्यरात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या निवासस्थाना जवळचा परिसर असलेल्या खामल्यात रात्रीउशिरापर्यंत वर्दळ असते. तेथे अशी घटना घडल्याचे आणि दुस-या कुणालाही ती दिसली नसल्याचे पोलिसांना पटेनासे झालेले आहे. तरुणींच्या तक्रारीनुसार, ही घटना अंधा-या ठिकाणी घडली. संचिताने काही दिवसांपूर्वी गिट्टीखदान ठाण्यात एक तक्रार नोंदवली होती. त्याचा या घटनेसोबत संबंध आहे काय, ते तपासले जात आहे.