पिस्तुलातून सुटली गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2015 01:19 AM2015-05-04T01:19:10+5:302015-05-04T01:19:10+5:30
सुदैवाने मोठा अनर्थ टळला, अकोला पोलीस मुख्यालयातील घटना
अकोला: शस्त्रागार विभागातील पोलीस कर्मचार्याकडून अनावधानाने पिस्तुलमधून गोळी सुटल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पोलीस मुख्यालयात घडली. सुदैवाने गोळी भिंतीवर आदळल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, घटनेमुळे पोलीस मुख्यालयामध्ये चांगलीच धावपळ उडाली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांचे अंगरक्षक कैलास चौधरी हे महिनाभराच्या सुटीवर जाणार असल्याने, ते रविवारी दुपारी त्यांच्या ताब्यातील पिस्तूल व मॅग्झीनमधील काडतुसाचे दहा राऊंड शस्त्रागार विभागात जमा करण्यासाठी गेले. यावेळी पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार विभागामध्ये (आर्ममोरर) पोलीस कर्मचारी गजानन ढोरे हे कार्यरत होते. कैलास चौधरी यांनी त्यांच्याकडील पिस्तूल ढोरे यांच्या ताब्यात दिले. ढोरे यांनी पिस्तुलातील मॅग्झीन काढण्याचा प्रयत्न केला; परंतु मॅग्झीन निघत नसल्याने त्यांनी पुन्हा ते मॅग्झीन जोरकसपणे ओढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पिस्तुलाचे ट्रिगर (घोडा) ढोरे यांचेकडून अनावधानाने दाबल्या गेला आणि पिस्तुलातून सुटलेली गोळी लगतच्या भिंतीवर जाऊन आदळली. गोळी सुटण्याचा मोठा आवाज झाल्याने पोलीस मुख्यालयात तैनात इतर कर्मचार्यांनी शस्त्रागार विभागाकडे धाव घेतली. पिस्तुलातील गोळी भिंतीवर आदळल्याचे पाहून पोलीस कर्मचार्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आली. त्यांनीही पोलीस मुख्यालयात जाऊन घटनेची माहिती घेतली.