गुप्तधनासाठी खड्डा; मुंबईतील ११ अटकेत
By Admin | Published: January 15, 2017 01:45 AM2017-01-15T01:45:57+5:302017-01-15T01:45:57+5:30
येथे बंद असलेल्या घरात गुप्तधनासाठी खड्डा खोदणाऱ्या ११जणांना दाभोळ पोलिसांनी अटक केली. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली.
दाभोळ (जि. रत्नागिरी) : येथे बंद असलेल्या घरात गुप्तधनासाठी खड्डा खोदणाऱ्या ११जणांना दाभोळ पोलिसांनी अटक केली. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली. गुप्तधन खोदण्यासाठी मांत्रिकाने दोन वाहनातून मुंबईतून लोक आणले होते. अटक केलेल्या लोकांच्या नावांबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली आहे.
येथील गणपती मंदिराच्या पुढील बाजूस नेहमी बंद असलेल्या घरात शनिवारी पहाटे खोदकामाचा आवाज येत होता. याचवेळी दाभोळ सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश तायडे हे सहकाऱ्यांसह मध्यरात्री पेट्रोलिंग करत होते. त्यांना संशय आल्याने ते या घरात गेले. त्यावेळी पोलिसांना माजघरात एक मोठा खड्डा खणलेला दिसला. खड्ड्याच्या एका बाजूला माती पडलेली दिसली, तर जवळच एकजण मंत्र उच्चारत होता. बाजूला हळद पिंजरीने रेषा आखलेल्या व खड्ड्यामध्ये नारळ, लिंबू असे साहित्य दिसून आले. या घरात दहा अनोळखी लोक व एक महिला दिसली. पोलिसांना सर्वाची कसून चौकशी केल्यानंतर प्रकार उघडकीस आला.
हे घर आपल्या ताब्यात आहे. आपली आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक असून, ती सुधारण्यासाठी भगताने सांगितल्यानुसार आपण गुप्तधन काढण्याच्या हेतूने हा विधी करत आहे. तसेच मंत्र म्हणणारा माणूस हा गुप्तधन काढून देण्याकरिता जादूटोणा करतो, असे त्यातील एकाने सागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व ११ आरोपींना १७ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
बंगाली मांत्रिकाचा समावेश?
दाभोळ येथील घटनेत जादूटोणा करणारा मांत्रिक बंगाली असल्याची चर्चा आहे.