दोन चिमुरड्यांचा गळा आवळून पित्याचीही आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:10 PM2017-09-07T12:10:05+5:302017-09-07T12:40:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर (अहमदनगर) : सतत गरिबीशी झुंजणा-या बापाने आपल्याच चिमुरड्यांचा गळा आवळून खून केला. नंतर स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर गावात घडली.
पोखरी बाळेश्वर गावातील सोंडवस्ती येथे अशोक संतुजी फटांगरे (वय ३५) हा तरुण त्याची पत्नी कविता व प्रफुल्ल (वय ७, पहिली) हा मुलगा व अस्मिता (वय ११, पाचवी) ही मुलगी यांच्यासोबत राहत होता. मंगळवारी पत्नी कविता हिला अशोकने संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे माहेरी पाठविले होते. दरम्यान बुधवारी रात्री अशोक आपल्या दोन्ही मुलांसह झोपी गेला होता. मुलांना गाढ झोप लागलेली पाहून अशोकने दोन्ही मुलांचा दोरीने गळा आळवून खून केला. त्यानंतर स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सकाळी शेजा-यांनी ही घटना पाहिली. त्यांनी तात्काळ संगमनेर पोलिसांना कळविले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदनासाठी तिघांचेही मृतदेह संगमनेरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
अशोक फटांगरे याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखिची आहे. अनेकांकडून त्याने हातउसने पैसे घेतले होते. या पैशांचा तगादा तसेच आजारपण याला कंटाळून अशोकने प्रफुल्ल (वय ७, पहिली) व अस्मिता (वय ११, पाचवी) यांचा गळा घोटून स्वत:ही गळफास घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.