पिचड पिता-पुत्र आगीतून फुफाट्यात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 05:10 PM2019-07-30T17:10:30+5:302019-07-30T17:14:26+5:30
पिचड पुता-पुत्रांनी आदिवासींमध्ये युती धनगर आरक्षणाच्या बाजूने असल्याचे बिंबवले होते. धनगर समाजाला एसटीमध्ये समाविष्ट केल्यास आदिवासी समाजाचे आरक्षण विभागले जाईल, असं चित्र निर्माण केले होते. हेच आता पिचड कुटुंबियांच्या अंगलट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई - सत्ता नसल्यामुळे मतदार संघातील विकास खुंटतो. आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीचं सरकार येणार नाही. त्यामुळे सत्तेसोबत राहुन विकास करण्याच्या उद्देशाने आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे वरिष्ठ नेते मधुकर पिचड यांनी म्हटले. परंतु, मतदार संघातील आदिवासी समाजाचा आक्रोश आणि राज्य सरकारने एसटी प्रवर्गातील योजना धनगर समाजासाठी लागू केल्यामुळे पिचड यांच्यासमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. किंबहुना आदिवासी समाज विरोधात जाण्याची शक्यता असून पिचड पिता-पुत्रांची अवस्था आगीतून निघून फुफाट्यात तर होणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने अभूतपूर्व यश मिळवले. अनेक विधानसभा मतदार संघात युतीच्या उमेदवारांनी आघाडी मिळवली. परंतु, अकोले मतदार संघात ती कामगिरी करण्यात युतीला अपयश आले. वास्तविक पाहता, अकोले विधानसभा मतदार संघातून २००९ आणि २०१४ मध्ये शिवसेनेला आघाडी मिळाली होती. यावेळी मात्र येथील मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला डावलल्याचे दिसून आले. यामध्ये वैभव पिचड यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले होते. लोकसभा निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला याच आदिवासी मतांच्या जोरावरच आघाडी मिळवून दिली होती. मात्र पक्षांतरामुळे वैभव पिचड यांना आदिवासी मतांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
लोकसभेला या मतदार संघात धनगर आरक्षणाचा मुद्दा आघाडीच्या पथ्यावर पडला. धनगर आरक्षणासंदर्भात भाजप निर्णय घेईल, या भितीने येथील आदिवासी समाजाने भाजप-सेना युतीला डावलले. यासाठी पिचड पुता-पुत्रांनी आदिवासींमध्ये युती धनगर आरक्षणाच्या बाजूने असल्याचे बिंबवले होते. धनगर समाजाला एसटीमध्ये समाविष्ट केल्यास आदिवासी समाजाचे आरक्षण विभागले जाईल, असं चित्र निर्माण केले होते. हेच आता पिचड कुटुंबियांच्या अंगलट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
धनगर आरक्षणाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे. मात्र वैभव पिचड यांनी शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्यास आघाडीकडे वळविलेल्या आदिवासी मतदारांना परत युतीशी जोडणे कठिण आहे. दुसरीकडे अकोले येथील भाजप नेते, पिचड पिता-पुत्रांच्या विरोधात गेले आहेत. मधुकर पिचड यांच्याविरुद्ध अकोले येथे भाजपनेते अशोक भंगारे यांच्या नेतृत्वात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. एकूणच तालुक्यातील आदिवासी समाज विरोधात गेल्यास विधानसभा निवडणूक पिचड पिता-पुत्रांना खडतर ठरण्याची शक्यता आहे.