पितृभक्ती : जळगावात वडिलांच्या साहित्याचे मृत्यूपश्चात प्रकाशन
By admin | Published: September 28, 2016 11:01 PM2016-09-28T23:01:39+5:302016-09-28T23:01:39+5:30
भगवत गितेवरील वडिलांनी तयार केलेले सहज व सोप्या भाषेतील ‘गीतामृत’ या पुस्तकाचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले यांनी त्यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशन करीत पितृभक्तीचा प्रत्यय दिला
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 28 : श्रीमद भगवत गितेवरील वडिलांनी तयार केलेले सहज व सोप्या भाषेतील ‘गीतामृत’ या पुस्तकाचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले यांनी त्यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशन करीत पितृभक्तीचा प्रत्यय दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले यांचे वडील दामोदर पांडुरंग बोरोले यांचे ९ आॅक्टोबर २०१५ रोजी निधन झाले. सेवानिवृत्त साहाय्यक निबंधक असलेले दामोदर बोरोले हे धार्मिक प्रवृत्तीचे होते.
श्रीमद् भगवद्गीता व ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास करून त्यांनी तो सहज व सोप्या भाषेत सर्वसामान्याना समजेल असा लिहून ठेवला होता. वडिलांच्या निधनानंतर प्रमोद बोरोले यांनी त्यांच्याशी संबधित कागदपत्रे पाहिली. त्यात गीतेवरील हस्तलिखित मिळून आले. प्रमोद बोरोले यांनी हे हस्तलिखित आपल्या परिचित असलेल्या दोन ते तीन जणांना वाचण्यासाठी देऊन पुस्तक तयार करता येईल का? अशी विचारणा केली. सर्वसामान्य व्यक्तीला सहज आणि सोप्या भाषेत समजेल असे हे लिखाण असल्याने पुस्तक तयार करण्यासाठी त्यांनी सहमती दर्शविली. त्यानुसार प्रमोद बोरोले यांनी ‘गीतामृत’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती तयार केली.
बुधवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वडिलांच्या प्रेमापोटी हे पुस्तक तयार केल्यामुळे त्याची विक्री न करता बोरोले यांनी प्रकाशित केलेल्या एक हजार प्रती वडिलांचे मित्र, वारकरी ग्रुप, गजानन महाराज सत्संग ग्रुपमधील सदस्यांना हे पुस्तक मोफत भेट देण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रकाशनावेळी ग.स.सोसायटीचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदू वाणी, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होेते.