'पिया'चे नाही, प्रियकराचेच घर 'प्यारे'!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 04:12 PM2016-07-29T16:12:13+5:302016-07-29T16:12:32+5:30

'मै तो भुल चली बाबूल का देश...पिया का घर प्यारा लगे' हीच सर्वसाधारण भारतीय कुटुंबातील विवाहितेची भावना असते. अहमदाबाद येथील एका विवाहित युवतीला मात्र 'बाबूल'

'Piya', 'dear' to the house of beloved! | 'पिया'चे नाही, प्रियकराचेच घर 'प्यारे'!

'पिया'चे नाही, प्रियकराचेच घर 'प्यारे'!

Next

नितीन गव्हाळे,

अकोला: 'मै तो भुल चली बाबूल का देश...पिया का घर प्यारा लगे' हीच सर्वसाधारण भारतीय कुटुंबातील विवाहितेची भावना असते. अहमदाबाद येथील एका विवाहित युवतीला मात्र 'बाबूल' अन् 'पिया'च्या घरापेक्षा 'प्रियकर'च अधिक 'प्यारा' असल्याचे अकोल्यात गुरूवारी रात्री समोर आले. अकोल्यातील प्रियकरासोबत तिसऱ्यांदा पळून आलेल्या अहमदाबाद येथील विवाहित युवतीची, येथील रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्रभर समजूत काढण्यात आली; मात्र तिने तिच्या माहेरच्या लोकांसोबत पतीकडे परत जाण्यास साफ नकार दिला. अखेर प्रेमाचा विजय झाला व ती विवाहिता 'पिया'च्या  घराऐवजी प्रियकराच्या घरी रवाना झाली.

तीन वर्षांपूर्वी अहमदाबाद येथील युवतीची एका लग्नसमारंभात नात्यातीलच युवकासोबत ओळख झाली. त्यावेळी ती अल्पवयीन होती. युवक अकोल्यात एका दुकानात नोकरी करतो. त्याच्या घरची आर्थिक परिस्थितीही बेताचीच आहे. असे असतानाही युवती त्याच्यावर भाळली. युवकाचे नातेवाईक अहमदाबादला राहत असल्याने, त्याचे अहमदाबादला नेहमी जाणेयेणे असायचे. लग्नसमारंभातील परिचयानंतर दोघांच्याही अहमदाबादमध्ये गाठीभेटी वाढल्या. त्यातून प्रेम अंकुरले अन् गाठी पक्क्या झाल्या. दोघांनीही सोबत जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतल्या. प्रेमविवाहात नेहमी अडथळा ठरणारा जातीचा अडसर नसल्याने, कुटूंबीय आपल्या प्रेमाचा स्वीकार करतील, असा विश्वास दोघांनाही वाटत होता.

प्रियकर प्रेयसीला भेटायला अधूनमधून अकोल्याहून अहमदाबादला जात असे. योग्य वेळ येताच कुटुंबीयांना प्रेमाची कल्पना देण्याचे दोघांनी ठरविले होते; मात्र तशी वेळ येण्यापूर्वीच त्यांच्या प्रेमसंबधांची कुणकुण युवतीच्या कुटुंबीयांना लागली. त्यांनी युवती अल्पवयीन असूनही, वेळ न दवडता तिचा विवाह ठरविला. युवतीने विवाहास नकार दिला; मात्र कुटुंबीयांनी तिच्या विरोधास भीक न घालता, नात्यातीलच सुखवस्तू घरातील मुलाशी जबरदस्तीने तिचा विवाह लावून दिला.

 (विवाहितेचे प्रियकरासोबत तिस-यांदा पलायन)

विवाहानंतरही युवतीचे प्रियकरावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. प्रियकर अकोल्याहून अहमदाबादला जायचा आणि प्रेयसीला चोरून भेटायचा. ती त्याला सोबत घेऊन जाण्याची गळ घालायची. शेवटी लग्न होऊन अवघे चारच महिने झाले असताना, नवविवाहितेने प्रियकरासोबत पलायन केले. दोघेही मुंबईला गेले. तिचा पती व माहेरच्या मंडळीने मुंबई पोलिसांच्या मदतीने प्रेमवीरांचा शोध घेतला आणि तिला परत आणले. पतीला पत्नीचे प्रेमप्रकरण समजल्यानंतरही त्याने मोठ्या मनाने पत्नीला घरात घेतले. त्यानंतर पंधरा दिवस उलटत नाहीत तोच, तिने पुन्हा प्रियकरासोबत पलायन केले.

यावेळी ते काही दिवस अकोल्यापासून नजीकच असलेल्या शेगाव येथे राहिले. पुन्हा युवतीच्या माहेरच्यांनी शोध घेऊन युवतीला पतीच्या घरी पोहचविले. त्यानंतरही प्रियकर-प्रेयसी ऐकमेकांना भेटायला आसुसलेले असायचे. शेवटी युवतीने महिनाभरातच प्रियकरासोबत तिसऱ्यांदा पलायन केले आणि दोघांनीही अकोल्यातील युवकाचे घर गाठले. युवकाच्या कुटुंबीयांना दोघांचे संबंध कबूल होते. दरम्यान, ही बाब पतीकडून युवतीच्या माहेरच्यांना कळताच, त्यांनी गुरूवारी प्रियकराचे घर गाठले. युवतीने त्यांच्या सोबत परत जाण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी युवतीला मारहाण केली. युवकाच्या घरच्यांनी त्यांना रोखले तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. अखेर युवतीला घेऊन दोन्ही कुटुंबं रामदासपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले.

तिथे युवतीने पोलिसांना तिची 'लव्हस्टोरी' सांगितली आणि तिच्या इच्छेविरूद्ध घरच्यांनी लग्न लावून दिल्याचे सांगितले. आपल्याला पतीकडे जायचे नसून, प्रियकरासोबत राहायचे आहे, असेही तिने पोलिसांना ठामपणे सांगितले. कुटुंबीयांनी युवतीला समजविण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु युवती तिच्या निर्णयावर ठाम होती. शेवटी पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील सदस्यांना आपसात चर्चा करून निर्णय घेण्यास सांगितले. त्यानंतरही युवती प्रियकराकडेच राहण्याबाबत ठाम असल्यामुळे युवतीच्या कुटुंबीयांंना रिकाम्या हाती अहमदाबादला परतावे लागले. रक्ताचे नाते, पती-पत्नीचे नाते हरले अन् प्रियकराचे प्रेम जिंकले.

पतीची तक्रारच नाही!
पत्नीला तिच्या प्रियकराने पळवून नेल्याची तक्रार पतीने कोणत्याही पोलीस ठाण्यात केलेली नाही. अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्यामुळे पोलीस आपल्यावरच कारवाई करतील, या भीतीपोटी त्याने तक्रार देण्याचे टाळल्याची माहिती समोर आली आहे. त्याने युवतीच्या माहेरच्यांना समोर करून, त्यांच्या माध्यमातूनच पत्नीला परत आणण्यासाठी प्रयत्न चालविले होते.
पोलीस म्हणतात, तक्रार नसल्याने कारवाई नाही!

युवती सज्ञान असल्याने ती कुठेही जाण्यास मोकळी आहे. तिने पती किंवा माहेरी न जाता, प्रियकराकडे जाणे पसंत केले. कोणाचीही तक्रार नसल्यामुळे आम्ही कारवाई करण्यास असमर्थ होतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: 'Piya', 'dear' to the house of beloved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.