मनसे साफ फसली आहे, गर्तेत सापडली आहे; पीयुष गोयल यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 05:16 PM2018-03-20T17:16:26+5:302018-03-20T17:44:27+5:30
मनसेबद्दल रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी एक विधान केलं आहे.
मुंबई- रेल्वे भरती परीक्षेतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आज मध्य रेल्वेवरील दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान 'रेल रोको' केलं होतं. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांना पाठिंबा देणाऱ्या मनसेबद्दल रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी एक विधान केलं आहे. रेल्वे परीक्षेसाठी दीड कोटी मुलांनी अप्लाय केलं, त्यामुळे मनसे पूर्णपणे फसलेली आहे, दरीत गेली आहे, असं रेल्वे मंत्री पीयुष गोयल म्हणाले. मंगळवारी शिवसेना खासदारांबरोबर झालेल्या बैठकित पियुष गोयल यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे पीयुष गोयल यांना नेमकं काय म्हणायचं? असा प्रश्न विचारला जातो आहे. शिवसेना खासदारांबरोबरच्या बैठकीत पीयुष गोयल बोलत होते. त्यावेळी तेथे काही पत्रकारही उपस्थित होते. पत्रकार समोर असल्याचं लक्षात आल्यावर पीयुष गोयल यांनी बोलणं सावरलं. या संदर्भातील एक व्हिडीओ समोर आला आहे.
खासदार आनंदराव अडसूळ, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, चंद्रकांत खैरे, श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य सेना खासदारांच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली.यावेळी शिवसेना आणि पीयुष गोयल यांच्यात रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. अॅप्रेंटिस उमेदवारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी शिवसेना खासदारांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
दरम्यान, रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांच्या या विधानावर मनसेनेही प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पियुष गोयल यांच्या पायाखालची जमीन खचली आहे. अशा विधानांना आम्ही किंमत देत नसून महाराष्ट्रात मराठी मुलांना प्राधान्य मिळायलाचं हवं, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. पियुष गोयल यांच्या या वक्तव्यावर मनसेकडून आणखी काही उत्तर मिळतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय आहे प्रकरण?
रेल्वे भरतीतील गोंधळामुळे अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी (20 मार्च) दादर-माटुंग्यादरम्यान रेल रोको केला . या रेल रोकोमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेवरील माटुंगा ते दादरदरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडल्यानं एकही लोकल पुढे सरकू शकत नाही. त्यामुळे लोकलसह एक्स्प्रेस गाड्याही खोळंबल्या आहेत. परंतु या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांवर हे आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ ही रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच आली आहे. आधी रेल्वे अप्रेटिंसच्या विद्यार्थ्यांना थेट रेल्वेत सामावून घेतलं जात होतं, पण आता त्यासाठी रेल्वे प्रशासनानं 20 टक्क्यांच्या कोटा आरक्षित केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये सामावून घेण्यासाठी लेखी परीक्षाही अनिवार्य केली आहे. त्यामुळे बाहेरून येणा-या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य दिलं जात असल्याचा या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रेल्वे प्रशासनानं मान्य न केल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला. विशेष म्हणजे यात अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.