प्रार्थना स्थळे ‘अनलॉक’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 05:28 AM2020-11-17T05:28:42+5:302020-11-17T05:29:03+5:30
भाविकांची गर्दी, राज्यात ठिकठिकाणी पहाटेपासून रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड-१९ च्या प्रकोपामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून उघडण्यात आली आहेत. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आणि हाजी अली दर्ग्यासारख्या प्रार्थना स्थळांवर भाविकांची गर्दी दिसून आली.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपूरचे विठ्ठुल मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिरात दर्शनाची आस लावून बसलेल्या भाविकांनी भल्या पहाटे रांगा लावल्या होत्या. हाजी अली दर्ग्यावरही हीच स्थिती होती. सिद्धिविनायक मंदिरात दररोज एक हजार भाविकांना दर्शनाची परवानगी असेल. सर्वांना टप्प्याटप्प्याने दर्शनाची मुभा दिली जाईल. मोबाईल ॲपवरून दर्शनासाठी बुकिंग करता येईल, असे या मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.
सिद्धिविनायक मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात असून
भाविकांच्या शरीराचे तापमान मोजल्यानंतरच दर तासाला शंभर भाविकांना दर्शनासाठी आत सोडले जात आहे. हात स्वच्छ करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
कोविडमुक्त क्षेत्रातच परवानगीवर भर...
सरकारने जारी केलेल्या मानक संचालन प्रक्रियेनुसार (एसओपी) कोविडमुक्त क्षेत्रातील धार्मिक स्थळे उघडण्यावर भर देण्यात आला आहे. नियमांचे पालन करीत भाविकांना मंदिरांमध्ये दर्शनाची परवानगी असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत शनिवारी धार्मिक स्थळे खुली करण्याची घोषणा केली होती. कोरोना विषाणूचा राक्षस अजूनही अस्तित्वात आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.