वृक्ष छाटणीवरून पालिकेत वाद
By admin | Published: September 13, 2014 03:08 AM2014-09-13T03:08:58+5:302014-09-13T03:08:58+5:30
सदस्यांच्या डोळ्यांत धूळफेक करून विकासकामात अडथळा ठरणा-या वृक्षांच्या छाटणीचा डाव आखला
मुंबई : सदस्यांच्या डोळ्यांत धूळफेक करून विकासकामात अडथळा ठरणा-या वृक्षांच्या छाटणीचा डाव आखला जात असल्याचा संशय वृक्ष प्राधिकरण समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांनी केला़ एका प्रकल्पाबाबत शहानिशा करण्यासाठी घटनास्थळाच्या पाहणीची मागणी सदस्यांनी लावून धरली़ मात्र प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावल्यामुळे ही बैठक वादळी ठरली़
एका कंपनीच्या प्रकल्पात अडथळा ठरणारे २४९ वृक्ष छाटण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली होती़ त्यानुसार या
वृक्षांचे पुनर्रोपणही होणार होते़ परंतु याबाबत माहिती देताना ८७
वृक्ष दाखविण्यात आले असून, वृक्षांची आकडेवारी २९वरून ५० ते ३८७पर्यंत प्रस्तावात दर्शविण्यात आली आहे़ सदस्यांना खोटी आकडेवारी दाखवून प्रस्ताव मंजूर करून घेण्यात येत असल्याचा आरोप सदस्यांनी केला़ सर्वपक्षीय सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरत प्रशासनाला फैलावर घेतले़ विकासकामांसाठी सररास वृक्ष कत्तल सुरू असते़ त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी हे वृक्ष असलेल्या जागेच्या पाहणीसाठी जाण्याची इच्छा सदस्यांनी दर्शविली़
परंतु अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी ताठर भूमिका घेत ही मागणी अमान्य केली़ तसेच याबाबत आयुक्त सीताराम कुंटेच निर्णय घेतील, असे स्पष्ट करीत आपला बचाव केला़ (प्रतिनिधी)