कॅनडा सरकार बनवणार पंढरपूरच्या विकासाचा प्लान, 2 हजार कोटी गुंतवण्याची योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 12:19 PM2017-09-23T12:19:18+5:302017-09-23T12:24:52+5:30
पंढरपूर हे महाराष्ट्रातील लाखो वारक-यांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात.
सोलापूर - पंढरपूर हे महाराष्ट्रातील लाखो वारक-यांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. आता लवकरच या पंढरपूर शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे. भारत आणि कॅनडा या दोन देशांच्या मैत्रीला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने कॅनडा सरकार भारतातील एका शहराचा विकास करणार आहे.
कॅनडा सरकारने यासाठी महाराष्ट्रातील पंढरपूरची निवड केली आहे. कॅनडाकडून मिळणा-या मदतीमुळे पंढरपूर शहराचे रुपडे पालटून जाईल. कॅनडा पंढरपूरमध्ये दोन हजार कोटीची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात शुक्रवारी रात्री पंढरपूर मंदिर समिती, राज्य सरकार आणि कॅनडा सरकारच्या प्रतिनिधींची एक बैठक पार पडली.
पंढरपूर शहर विकासासाठी 2 हजार कोटींचा प्रकल्प तयार करण्यात येत आहे अशी माहिती पंढरपूर मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकार प्लान आखणार आहे. येत्या तीन ऑक्टोंबरला कॅनडा सरकारचे प्रतिनिधी चर्चेसाठी पंढरपूरला येणार असल्याची माहिती आहे.