कंत्राटी मनुष्यबळाचा वापर करून नियोजन करा, राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 06:49 AM2023-03-19T06:49:28+5:302023-03-19T06:49:45+5:30

आरोग्यसेवा आयुक्त धीरज  कुमार यांनी याबाबत सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. 

Plan using contract manpower, instructions to District Health Officers in the State | कंत्राटी मनुष्यबळाचा वापर करून नियोजन करा, राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना

कंत्राटी मनुष्यबळाचा वापर करून नियोजन करा, राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना

googlenewsNext

मुंबई : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या संपाला पाच दिवस उलटल्याने रुग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला आहे, या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णसेवेत कुठेही बाधा येऊ नये,  आरोग्य सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध राहाव्यात यासाठी पर्यायी तसेच कंत्राटी मनुष्यबळाचा वापर करून नियोजन करावे, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आरोग्यसेवा आयुक्त धीरज  कुमार यांनी याबाबत सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. 

संपकाळात विशेषतः अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, लेबर रूम या संवेदनशील विभागांची सेवा अविरत राहील याबाबत दक्षता घ्यावी. पर्यायी मनुष्यबळाबाबत आवश्यक उपाययोजना आखून रुग्णसेवा बाधित होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत पत्रात सूचना देण्यात आल्या आहेत.  याखेरीज, अपघात विभाग, आपत्कालीन कक्ष, रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्यात याव्यात, जेणेकरून कुठल्याही आपात्कालीन परिस्थितीत रुग्णसेवा अखंडित सुरू राहील, क्षेत्रिय स्तरावर राष्ट्रीय आरोग्य अभियान व इतर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध कंत्राटी मनुष्यबळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवांसाठी नियुक्त करावे, आवश्यकतेनुसार दैनंदिन तत्वावर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावर दैनंदिन तत्वावर मनुष्यबळ नियुक्तीस मान्यता दिली आहे. 

समन्वय साधा...
सरकारी व खासगी नर्सिंग महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, औषधनिर्माता महाविद्यालये यांच्याशी समन्वय साधून त्यांचेमार्फत आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करावी आणि संपकाळात या महाविद्यालयांमार्फत उपलब्ध प्रशिक्षणार्थीच्या नेमणुका रुग्णालयांमध्ये कराव्यात, असे निर्देशही आरोग्य विभागाने दिले आहेत.

Web Title: Plan using contract manpower, instructions to District Health Officers in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.