गोंदियात विमान कोसळले
By admin | Published: April 27, 2017 01:47 AM2017-04-27T01:47:32+5:302017-04-27T01:47:32+5:30
गोंदियाजवळील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेचे (एनएफटीआय) प्रशिक्षणार्थी विमान, बुधवारी महाराष्ट्र-मध्य प्रदेश
विजेंद्र मेश्राम/हुपराज जमईवार/ खातिया/परसवाडा (गोंदिया)
गोंदियाजवळील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेचे (एनएफटीआय) प्रशिक्षणार्थी विमान, बुधवारी महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील वैनगंगा नदीत कोसळले. यात प्रशिक्षक व शिकाऊ वैमानिक तरुणी जागीच मृत्युमुखी पडले. रंजन गुप्ता (४५) आणि हिमानी गुरुदाससिंह कल्याणी (२४ रा. दिल्ली) अशी त्यांची नावे आहेत.
‘डीए-४२ नाईक’ या चार आसनी विमानाने बिरसी विमानळावरून सकाळी ९.२५ उड्डाण केल्यानंतर, जवळपास ९.४० पर्यंत हे विमान एअर ट्राफिक कंट्रोल (एटीसी) रूमच्या संपर्कात होते, त्यानंतर संपर्क तुटला. पण १० मिनिटांत संपर्क न झाल्यामुळे एनएफटीआय आणि बिरसी विमानतळाच्या संचालकांना एटीसीने माहिती दिली. शोधाशोध केली असता, हे विमान गोंदियापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवरी-लावणी या गावाजवळील वैनगंगा नदीच्या पात्रात आढळले.
‘रोप-वे’च्या तारांमध्ये अडकले
हे विमान वैनगंगा नदीवरून अत्यंत खालच्या बाजूने उडत येत होते. त्यामुळे वैनगंगा नदीच्या काठावरील दोन तीरांवर असलेल्या देवरी आणि लावणी गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटू नये, म्हणून तयार केलेल्या ५० फूट उंचीवरील रोप-वे च्या ताराला ते स्पर्शून गेले. त्यानंतर, अनियंत्रित होऊन नदीपात्रात कोसळले. विमान कोसळले, त्या वेळी नदी पात्रात कपडे धूत असलेल्या तीन महिलांपैकी इंतू चैनलाल मेश्राम (१९) ही तरुणी किरकोळ जखमी झाली.
दिल्लीचे चौकशी पथक रवाना
या छोट्या विमानात ब्लॅक बॉक्स नसतो. त्यामुळे विमान अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी दिल्लीवरून तंत्रज्ञांना बोलविले आहे. ते येऊन तपासणी करेपर्यंत विमानाचे अवशेष नदीतून हलविता येणार नाहीत.
- राजा रेड्डी, संचालक,
बिरसी विमानतळ गोंदिया