युद्धापूर्वीच तहाची भाषा
By admin | Published: April 26, 2016 03:30 AM2016-04-26T03:30:24+5:302016-04-26T03:30:24+5:30
कल्याण सार्वजनिक वाचनालयाने अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये घेण्याची मागणी केली असताना मुळात ही मागणी ज्या मसापच्या जिल्हा प्रतिनिधींनी करायला हवी होती
मुरलीधर भवार,
कल्याण- कल्याण सार्वजनिक वाचनालयाने अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये घेण्याची मागणी केली असताना मुळात ही मागणी ज्या मसापच्या जिल्हा प्रतिनिधींनी करायला हवी होती, त्यांनी अखिल भारतीय नाही तर निदान विभागीय संमेलन तरी आम्हाला साजरे करू द्या, अशी बोटचेपी भूमिका घेतली आहे. मसापच्या वर्षानुवर्षे पदाला चिकटून बसलेल्या जिल्हा प्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळेच आतापर्यंत कल्याण-डोंबिवलीत साहित्यसंमेलन झालेले नाही, असा आरोप तरुण लेखक, साहित्यिक यांनी केला आहे.
कल्याणचे प्रभाकर संत, ठाण्याचे पद्माकर शिरवाडकर व डोंबिवलीचे सुरेश देशपांडे हे मसापचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. संत व शिरवाडकर हे गेली सुमारे १०वर्षे जिल्हा प्रतिनिधी असून देशपांडे हे अलीकडेच जिल्हा प्रतिनिधीपदी नियुक्त झाले. संत व शिरवाडकर दोघे वयोवृद्ध आहेत. संत यांना श्रवणयंत्राखेरीज ऐकू येत नाही. ते दीर्घकाळ बैठकीला बसू शकत नाहीत. मात्र, तरीही तरुण पिढीकडे जिल्हा प्रतिनिधीपद सोपवून कल्याण-डोंबिवलीतील नव्या दमाच्या लेखक, कवी यांना संधी देण्याची तयारी त्यांनी दाखवलेली नाही. मसापची निवडणूक टाळण्याकडे व स्वत:ची वर्णी
लावून घेण्याकडे या मंडळींचा कल असल्याचे तरुण साहित्यिकांचे मत आहे.
कल्याण ही ऐतिहासिक नगरी आहे. तिला साहित्य संस्कृतीचा वारसा आहे. याठिकाणी अनेक साहित्यिक राहत होते व आहेत. मात्र, तरीही कल्याणमध्ये साहित्यसंमेलन झालेले नाही. कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे राजीव जोेशी यांनी आता संमेलनाची मागणी केली आहे.