शेतकऱ्यांच्या नियोजित संपात फूट

By admin | Published: May 17, 2017 01:29 AM2017-05-17T01:29:39+5:302017-05-17T01:29:39+5:30

शेतकऱ्यांनी १ जून रोजी राज्यव्यापी संप पुकारला असून, त्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री

The planned era of farmers | शेतकऱ्यांच्या नियोजित संपात फूट

शेतकऱ्यांच्या नियोजित संपात फूट

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/औरंगाबाद : शेतकऱ्यांनी १ जून रोजी राज्यव्यापी संप पुकारला असून, त्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर, नियोजित संपातून माघार घेतली आहे. मात्र, इतर जिल्ह्यांतील शेतकरी संपावर ठाम असल्याचे किसान क्रांतीने म्हटले आहे. या संदर्भात बुधवारी औरंगाबादेत राज्यव्यापी बैठक होत आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोफत वीज द्यावी. मालाला योग्य हमीभाव मिळावा आदी मागण्यांसाठी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय ४० गावांतील शेतकऱ्यांनी घेतला होता. पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी फडणवीस यांच्याशी मंगळवारी मुंबईत तासभर चर्चा केली. एक कोटीहून अधिक शेतकरी नियमितपणे कर्ज भरणारे आहेत. ३१ लाख शेतकऱ्यांचे कर्ज काही ना काही कारणाने थकीत आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांसाठी योजना तयार करण्याचे काम सरकार करीत आहे. योजना लवकरच जाहीर होईल, यापूर्वीही कर्जमाफी झाली, परंतु शेतकरी पुन्हा कर्जात गेला. शेतीच्या क्षेत्रात गुंतवणुकीला प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. धनंजय धनवटे, सुभाष वहाडणे, विजय धनवटे आदी शेतकऱ्यांनी कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारकडे चर्चा करा, १ जूनपूर्वी हमीभाव जाहीर करण्याच्या मागण्या केल्या. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेअंती संप स्थगित करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले.

पुणतांबा म्हणजे राज्य नव्हे!
शेतकरी संप मोहीम तथा किसान क्रांतीचे राज्य समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले, ‘शेतकरी संघटनांमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. पुणतांबा येथील शेतकरी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नाहीत. विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे यांना हाताशी धरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला,’ असा आरोपही त्यांनी केला.

४० ते ५० शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन हा संप पुकारला आहे. मुख्यमंत्र्यांचा फूट पाडण्याचा डाव हाणून पाडला जाईल. मुख्यमंत्र्यांनी संप समन्वय समितीशी चर्चा करणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी तसे केले नाही. विरोधक आणि सत्ताधारी सोबत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बुधवारी सकाळी औरंगाबादला राज्यव्यापी बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा होईल.

Web Title: The planned era of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.