नोटाबंदीच्या निर्णयाअगोदर नियोजन आवश्यक होते - अजित पवार
By admin | Published: November 17, 2016 01:51 AM2016-11-17T01:51:22+5:302016-11-17T01:51:22+5:30
नोटाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी या सरकारने योग्य नियोजन करण्याची आवश्यकता होती, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
भवानीनगर : केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णयामुळे सर्वसामान्यांचे अतोनात हाल होत आहेत. काळ्या पैशाला आळा बसावा, या मागणीला पाठिंबा आहे. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी या सरकारने योग्य नियोजन करण्याची आवश्यकता होती, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
सणसर येथे आयोजित खासगी कार्यक्रमात पवार बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे होते.
पवार म्हणाले, की केंद्र सरकारने अचानक निर्णय घेतल्यामुले सध्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातून सर्वसामान्यांचे अतोनात हाल होत आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी योग्य नियोजनाची आवश्यकता होती. मजूर वर्गाचे तर खूप हाल होत आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा देण्यास सुरुवात करूनदेखील सुट्टे पैसे मिळत नाहीत. सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे. खाद्यपदार्थांपासून देखील सुट्या पैशांअभावी दूर राहावे लागत आहे. गुंजवणीचे पाणी इंदापूर, बारामतीला मिळण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह आपणदेखील प्रयत्नशील आहोत. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे यांचे भाषण झाले. या वेळी प्रदीप गारटकर, अप्पासाहेब जगदाळे, तुकाराम काळे, प्रताप पाटील, प्रदीप निंबाळकर, रणजित निंबाळकर उपस्थित होते. (वार्ताहर)