अभ्यास करताना नियोजन करा, वेळापत्रक ठरविल्याने होतो फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 05:07 AM2019-05-05T05:07:02+5:302019-05-05T05:07:26+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून पनवेल येथील शशांक नाग हा अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
- वैभव गायकर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून पनवेल येथील शशांक नाग हा अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाला. नवीन पनवेल येथील डीएव्ही शाळेत तो शिक्षण घेत होता. त्याच्या या यशाबद्दल व त्याने घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्याच्याशी केलेली बातचीत.
प्रश्न - या यशाबद्दल तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
उत्तर - मला मिळालेल्या गुणांबद्दल मी खूप समाधानी आहे. मला खूप आनंद झाला आहे. मी कोणत्याही दडपणाखाली येऊन अभ्यास केला नाही. वेळ वाया न घालवता, जसा वेळ मिळेल, तसा मी अभ्यास करत राहिलो. विनाकारण मौजमस्ती करणे मात्र मी प्रकर्षाने टाळले.
प्रश्न - तू कसा अभ्यास केलास?
उत्तर - अभ्यास करताना प्रत्येक विषयाचे नियोजन करून मी अभ्यास करत असे. याकरिता मी स्वत: एक वेळापत्रक तयार केले होते. दिवसातून जसा वेळ मिळेल, तसा वेळापत्रकानुसार ठरल्याप्रमाणे विषयाचा मी अभ्यास करत असे. त्यामुळे प्रत्येक विषयासाठी चांगला वेळ मिळाला.
प्रश्न-तणाव घालविण्यास काय केले?
उत्तर - मला तबला वादनाचा छंद आहे. त्यामुळे अभ्यासादरम्यान तणाव आल्यास किंवा कंटाळा आल्यास मी तबला वाजवायचो. त्यामुळे मन शांत होत असे, तसेच संगीताची आवड असल्याने मी कधी-कधी आवडीची गाणी ऐकून तणावमुक्त होत असे.
प्रश्न - भविष्यात तू काय ठरविले आहेस?
उत्तर - मला विज्ञान क्षेत्रात माझे योगदान द्यायचे आहे. या दृष्टीने मी पुढील क्षेत्र निवडणार आहे. माझे वडील माझे रोल मॉडेल आहेत. ते शास्त्रज्ञ आहेत. मलाही त्यांच्यासारखे शास्त्रज्ञ होण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
प्रश्न - विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करशील?
उत्तर - नव्याने बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगू इच्छितो की, वेळेला महत्त्व द्या. वेळेचा अपव्यय करू नका. बोर्ड, तसेच महाविद्यालयीन दोन्ही परीक्षांना तेवढेच महत्त्व द्या. विशेष म्हणजे,
सोशल मीडिया व मोबाइलचा अतिवापर करू नका.
प्रश्न - शिक्षक आणि पालकांनी कशी मदत केली?
उत्तर - माझ्या यशात शिक्षकांसह पालकांचाही खूप मोठा वाटा आहे. डीएव्हीच्या प्राचार्य जयश्री खांडेकर यांनी वेळोवेळी सर्वतोपरी सहकार्य केल्याने मी हे यश गाठू शकलो. महत्त्वाचे म्हणजे, माझ्या कुटुंबीयांनी अभ्यास करण्यासंदर्भात कोणतीही बंधने कधीच घातली नाहीत.