नियोजनाचे गणित बिघडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:32 AM2019-06-23T06:32:58+5:302019-06-23T06:33:29+5:30
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, प्रवेश प्रक्रिया विभागांना प्रक्रियेमध्ये नको असलेली पारदर्शकता आणि अधिकाऱ्यांमधील असमन्वय यातून यंदाच्या व्यावसायिक प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला आहे.
- सीमा महांगडे
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी इच्छुक तब्बल २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेची अर्ध्याहून अधिक प्रक्रिया पूर्ण केल्यावर पुन्हा सर्व प्रक्रिया नव्याने राबविण्याचा प्रवेश प्राधिकरणाचा आणि सीईटी सेलचा निर्णय म्हणजे विद्यार्थी-पालकांवर वज्रप्रहार केल्यासारखाच आहे. त्यामुळे शालेय शिक्षणासोबत आता उच्च व तंत्रशिक्षणाची गाडी रुळावरून घसरल्याने किमान महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधांतरी आणि अंधारात असल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे.
राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश हे त्या त्या म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत राबवण्यात येत असे. यात काही अडचण आल्यास ते सीईटी सेलकडे पाठवण्यात येत असे. मात्र राज्याचे स्वतंत्र सीईटी सेल प्राधिकरण स्थापन होऊन कार्यान्वित झाल्यानंतर यापुढील केवळ सीईटी परीक्षाच नाही तर इंजिनीअरिंग, मेडिकल व नर्सिंग यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही सीईटीच्या एकाच छताखाली राबवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आणि इथेच नेमकी माशी शिंकली. आता संचालनालयांना केवळ त्यांच्याकडील अभ्यासक्रमांचे अधिनियम आणि प्रारूप बनवून ते सीईटी सेलकडे वेळेत सुपुर्द करणे आवश्यक होते. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने रेंगाळत ठेवलेले नियम आणि माहिती पुस्तिका आदी कारणांमुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया तब्बल आठ दिवस उशिरा सुरू झाली. आतापर्यंत सरकारकडून प्राथमिक शिक्षणालाच दुय्यम स्थान दिले जात असल्याचा समज होता, मात्र आता तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे अधिकाऱ्यांना मनमानी कारभार करायला देऊन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्रालयात बसलेल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अधिकाºयांना विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेतील वेळेचे महत्त्व कळत नसेल तर त्यांना उच्च विद्याविभूषित असण्याचा, मिरविण्याचा आणि त्याच शैक्षणिक गुणवत्तेमुळे पदावर बसल्याचा उपयोग तो काय, असा प्रश्न पडला आहे. शिवाय या सर्व प्रकारांमुळे राज्याच्या उच्च व तंत्र शालेय शिक्षणाप्रमाणेच उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाच्या धोरणांमध्ये असलेली विसंगतीही स्पष्ट होत आहे. व्यावसायिक प्रवेश प्रक्रियेवर स्थगिती आणण्यासाठी आणि ती पुन्हा नव्याने राबविण्याची जी नामुष्की आज प्रशासनावर ओढविली ती केवळ उच्च व तंत्र शिक्षण विभागातील असमन्वय आणि हलगर्जी यामुळे. पहिल्यांदाच आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा मोठा निर्णय घेणाºया सीईटी सेलकडे अन्य प्रशासकीय विभागांनी दुर्लक्ष केले आणि असहकार पुकारला. प्रवेश प्रक्रियेच्या सुरळीत कार्यवाहीसाठी आवश्यक आयटी तज्ज्ञ, प्रवेश तज्ज्ञ अधिकारी यांची वानवा प्रक्रियेदरम्यान आढळली. प्रवेशाचे काम असूनही सीईटी सेल कार्यालयात अपुरा असलेला कर्मचारी वर्ग आणि विविध विभागांच्या संचालकांनी प्रवेश प्रक्रियेकडे फिरवलेली पाठ या साºयाचा फटका व्यावसायिक प्रवेश प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांना बसला आणि यंत्रणाच ठप्प झाली. आता ती जरी पुन्हा नव्याने सुरू होणार असली तरी यामागे पुन्हा पालक-विद्यार्र्थ्यांचा जाणारा वेळ, पैसा, झालेला मनस्ताप, गोंधळ यावर सुस्त प्रशासन काही करू शकेल का हा प्रश्न उरतोच...!
कौशल्य, तंत्रज्ञान व नव्या गुणवत्तापूर्ण पिढीला नीतिमत्तेचे धडे देणाºया या उच्च व तंत्र शिक्षण खात्यातील हा कारभार खात्यामध्ये अंतर्बाह्य बदल होणे गरजेचे असल्याचे दाखविण्यासाठी पुरेसा ठरला आहे. अन्यथा उच्च व तंत्र शिक्षण विभागातील हे नैतिक कुपोषण खात्याला व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याला नैराश्याच्या दरीत लोटणारे ठरेल. शिवाय अभ्यासासाठी राज्य आणि देशापासून दूरचे पर्याय शोधण्यासाठी प्रवृत्त करणारे असून ते राज्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी मारक ठरू शकते.