नियोजनबद्ध काम सुरू - राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:28 AM2017-07-21T01:28:12+5:302017-07-21T01:28:12+5:30
औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय सुरू करताना ते उत्तम प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी काय योजना आहे, या राजेंद्र दर्डा यांनी टाकलेल्या गुगलीवर राम
औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय सुरू करताना ते उत्तम प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी काय योजना आहे, या राजेंद्र दर्डा यांनी टाकलेल्या गुगलीवर राम शिंदे यांनी सफाईदारपणे उत्तर दिले. शिंदे म्हणाले की, दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी या खात्याची निर्मिती केली. २५ वर्षांपर्यंत या खात्याला स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा नव्हती. मुख्यमंत्र्यांनी या खात्याचे नाव बदली करत मृद व जलसंधारण विभाग केले. त्यामुळे १६ हजार ४७९ स्वतंत्र आस्थापने निर्माण करत औरंगाबाद येथे त्याचे आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
वाल्मी या आॅटोनॉमस बॉडीच्या ठिकाणीच आयुक्तालयाचे कार्यालय उघडले. त्या ठिकाणी एक वरिष्ठ सनदी अधिकारी नेमण्याचे कॅबिनेट नोटमध्ये नमूद केले आहे. जलसंधारणाची कामे जलशिवार योजनेतून सुरू आहेत. आयुक्तालयाचा चार्ज संचालकांना दिला आहे. १५ जुलैपर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल.
जलयुक्त शिवाराचा गवगवा झाल्यानंतर आता त्याचा उत्साह कमी झाला आहे का, या प्रश्नावर राम शिंदे म्हणाले की, सलग तीन वर्षे दुष्काळ पडल्याने खूप कामे झाली. दोन वर्षे खूप कामे झाल्यावर पाऊस पडल्याने कामाचा वाव कमी झाला आहे. प्रशासकीय पातळीवर संपूर्ण नियोजन झालेले आहे. आता नियोजनबद्ध काम सुरू असून मुख्यमंत्री व मी स्वत: त्याचा आढावा घेत असतो. पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी दरवर्षी ५ हजार गावांनुसार २५ हजार गावांतील दुष्काळ संपुष्टात आणण्याच्या दृष्टीतून सरकार पातळीवर बारकाईने आढावा घेतला जातो. १५ दिवसांनी उच्च अधिकार समिती रिपोर्ट करत असते. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष निधीही दिलेला आहे.