निवडणूक फंडासाठी प्लॅस्टिकबंदीचा फार्स - राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:48 AM2018-06-27T06:48:18+5:302018-06-27T06:48:21+5:30
पर्याय द्या, मग लोकांना अक्कल शिकवा; नोटाबंदीप्रमाणेच घाईघाईत निर्णय
मुंबई : नोटाबंदीप्रमाणेच प्लॅस्टिकबंदीचा निर्णयसुद्धा घाईघाईत घेण्यात आला आहे. बंदीच्या नावाखाली लोकांच्या खिशात हात घालण्यापूर्वी सरकारने आधी प्लॅस्टिकला पर्याय द्यावा, आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात. सरकार जोपर्यंत ही जबाबदारी पार पाडत नाही, तोपर्यंत लोकांनी दंड भरू नये, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केले. बंदीचा हा निर्णय निव्वळ फार्स असून, निवडणूक फंडासाठीच हा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर मनसेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. प्लॅस्टिकबंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे हा निर्णय एका खात्याचा आहे की सरकारचा, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. जगाचे उदाहरण देत, प्लॅस्टिकबंदी लादण्यात आली, परंतु ज्याप्रमाणे परदेशात कचरापेटी वगैरे सुविधा दिल्या जातात, तशा कोणत्या सुविधा राज्य सरकारने अथवा इथल्या महापालिकांनी लोकांना दिल्या? पाच हजार, दहा हजारांचा दंड लावताना लोकांना काय पर्याय दिला? असे प्रश्न विचारून आधी पर्याय द्या, सुविधा निर्माण करा, त्यानंतरच बंदी वगैरे लावा, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
जगभर प्लॅस्टिक वापरले जाते. प्लॅस्टिक वाईट नाही, तर त्याचा कचरा ही समस्या आहे. याबाबत कोणत्याच महापालिकेने काम केलेले नाही. राज्य सरकार आणि महापालिकांनी आधी त्यांचे काम करावे आणि त्यांनतरच लोकांना अक्कल शिकवावी, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला
प्लॅस्टिकबंदीवर मनसेने आक्षेप घेतल्यावर राज ठाकरे आपल्या पुतण्याला घाबरू लागले, अशी टीका पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली होती. यावर, इवल्याशा बुद्धीचा हा माणूस आहे, अशी टीका राज यांनी कदम यांच्यावर केली. मुळात सांगकाम्यांना यातले काही कळणार नाही. माझा प्रश्न सरकार आणि प्रशासनाबाबत आहे. कदमांनी तो नात्याशी जोडून नात्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत राज यांनी कदम यांना फटकारले.