झाडे लावा चैतन्य फुलवा, पर्यावरणाचे संवर्धन करा
By admin | Published: July 22, 2016 02:27 AM2016-07-22T02:27:58+5:302016-07-22T02:27:58+5:30
धावपळीच्या आणि यंत्राच्या चाकाप्रमाणे फिरणाऱ्या आजच्या या विज्ञान युगात माणूस अनेक जबाबदाऱ्या पाठीशी घेऊन काम करत आहे.
धावपळीच्या आणि यंत्राच्या चाकाप्रमाणे फिरणाऱ्या आजच्या या विज्ञान युगात माणूस अनेक जबाबदाऱ्या पाठीशी घेऊन काम करत आहे. आपले काम आणि आपण एवढेच तो समजतो. मग त्याचे पर्यावरणाकडे लक्ष जाणार तरी कसे? निसर्गसौंदर्य पाहायला त्याला वेळच नाही. तो निसर्गाशी मैत्री साधत नाही, निसर्गाशी एकरुप होत नाही. निसर्गाशी एकरुप न झाल्याने नैसर्गिक विविधता, नाविन्य माणसाला उपभोगता येईल का? चैतन्य, प्रसन्नता यांचे सुख त्याला मिळेल का? नाही. कारण आजच्या धावपळीच्या युगात मानवाने निसर्गाला पाठ दाखवली आहे. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करुन आपल्या घातक कृतीतून मानवाने पर्यावरणाचा समतोल ढासळवला आहे. त्यामुळे प्रदूषण वाढले आहे. दररोज अनेक मार्गांनी होणाऱ्या प्रदूषणाचा सभोवतालच्या निसर्गावर, पर्यावरणावर, जनजीवनावर होणारा परिणाम फारच भयंकर आहे.
निसर्ग माणसाला चैतन्य देतो. आनंद, शांती, उत्साह व चैतन्य मिळविण्यासाठी माणसे निसर्गात रमतात. कंटाळा, दिवसभराचा शीण, आळस घालविण्यासाठी माणसे एखाद्या बागेत जातात. तेथील झाडं, फुलं त्या फुलांवर भिरभिरणारी फुलपाखरं, त्यांची रंगबिरंगी रुपे ते आपल्या नयनात टिपून घेतात. मग त्यांना आनंद मिळतो तो निसर्गाशी एकरुप झाल्याचा. प्रसन्नता आणि शांती लाभून त्यांचे मन उत्साही बनते.
वातावरण स्वच्छ, शांत ठेवायचे असेल आणि चैतन्य फुलवायचे असेल तर मग पर्याय एकच ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि चैतन्य फुलवा’. हे सांगण्याचे कारण एकच की, मनुष्य आळशी बनत चालला आहे. त्याने झाडे तोडली पण नवी झाडे लावली नाहीत. काही माणसे फक्त झाडाचे फळ चाखतात, पण झाडे लावत नाहीत की त्यांना पाणी घालत नाहीत. अंगणात असलेले झाड त्यांच्या कामासाठी पाहिजे असेल किंवा त्याची अडचण होत असेल तर ते झाड माणसे तोडतील पण दुसरे झाड लावणार नाहीत. इंधन टंचाईत मनुष्याने मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली. पण नवी झाडे लावली नाहीत. जंगल तोडीमुळे सृष्टीचे रुप बदलू लागले. हिरवाईचे प्रदेश ओसाड पडू लागले. नवी झाडे न लावल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळले. प्रदूषणाची समस्या निर्माण झाली. सृष्टीसौंदर्य हरपू लागले. शांतता व प्रसन्नता भंग पावली. मग जंगल संपत्ती नष्ट होऊ लागल्याने जंगलतोडीविषयक कायदे केले गेले, वृक्षरोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. झाडाफुलांजवळ मनुष्याला जे मिळते ते त्याचे जीवन. म्हणजेच त्याचा आनंद. मित्रांनो हिरव्यागार मखमलीवर पडून झाडांसंगे गप्पा मारुन फुलपाखरांसमवेत बागडून पहा किती मौज आहे. हा सुखद अनुभव अनुभवा. निसर्गात रमा, झाडे लावा त्यांची योग्य काळजी घ्या. झाडे जगवा, त्यामुळे सृष्टीला बहर येईल, सौंदर्य वाढेल आणि शांतता लाभून तुमच्या जीवनात चैतन्य व नवा उत्साह फुलेल.
- अभिजीत शशिकांत पिसे.
अक्षरशिल्प, खेंड चिपळूण
>सृष्टीसौंदर्यात दंग झाल्याने माणसाला नवचैतन्य मिळते. माणूस जर आनंदी असेल, उत्साह व चैतन्य त्याच्याकडे असेल तर तो खऱ्या अर्थाने जीवन जगेल. ज्याचा आनंद शुध्द, त्याचे जीवन शुध्द. हा आनंद लाभणार या सृष्टीत, निसर्गाच्या सान्निध्यात, झाडाफुलांच्या सहवासात. म्हणूनच ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि चैतन्य फुलवा’. सृष्टीसौंदर्य वाढवा, झाडे लावून सृष्टीचे रुप हिरवेगार ठेवा.
‘झाडे लावा झाडे लावा, झाडे जगवा चैतन्य फुलवा
झाडे लावा प्रदूषण टाळा, आरोग्य टिकवा, जीवन फुलवा’