पर्यावरण दिनानिमित्त नेरूळमध्ये वृक्षारोपण
By admin | Published: June 9, 2016 03:02 AM2016-06-09T03:02:44+5:302016-06-09T03:02:44+5:30
महापालिकेच्या नेरूळ प्रभाग ९६ मध्ये वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या नेरूळ प्रभाग ९६ मध्ये वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पामबीचसह परिसरातील मोकळ्या जागेवर या पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्यांची देखभाल केली जाणार आहे.
सेक्टर १८ मधील सागर दर्शन सोसायटीजवळ ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेची सुरवात करण्यात आली. वाहनांची सर्वाधिक वर्दळ असणारा पामबीच रोड या प्रभागाला लागून आहे. वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण होवू नये यासाठी पूर्वी सिडको व आता महापालिकेने जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्याचे धोरण आखले आहे. स्थानिक नगरसेविका रूपाली किस्मत भगत व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणेश भगत यांनी या परिसरात वृक्षलागवड मोहीम हाती घेतली असून परिसरातील नागरिकांनीही वृक्षारोपण मोहिमेचे स्वागत केले आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गणेश नाईक यांनी पालिकेने केलेल्या चांगल्या कामांची माहिती दिली. कोणतीही करवाढ न करता सर्वोत्तम सुविधा नवी मुंबईकरांना उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सागर दर्शन सोसायटीमध्ये महानगर गॅसवाहिनी टाकण्याच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगरसेवक सूरज पाटील, सुमीत अग्रवाल, प्रीती पाटील, संजय पाथरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.