तरुणांना हवीय सिनेगीतांवर लावणी !
By admin | Published: September 8, 2016 11:46 PM2016-09-08T23:46:46+5:302016-09-08T23:46:46+5:30
तरुणांची बदलती अभिरुची यामुळे पारंपरिक लावणीला मागणी कमी झाली असून, तरुणांना सिनेगीतांवर लावणी हवीय.
ऑनलाइन लोकमत
जालना, दि. 8 - लावणी ही महाराष्ट्राची लोककला. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानात झालेले बदल आणि तरुणांची बदलती अभिरुची यामुळे पारंपरिक लावणीला मागणी कमी झाली असून, तरुणांना सिनेगीतांवर लावणी हवीय. बदलत्या पिढीनुसार आम्हालाही बदलावे लागेल, असे मत लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
जालना गणेश फेस्टिवलमध्ये नऊ दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्व. कल्याणराव घोगरे स्टेडियममध्ये सुरु असलेल्या या फेस्टिवलमध्ये बुधवारी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरचा नटरंगी नार हा लावणीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी स्टेडियम अक्षरश: फुल्ल झाले होते.
याप्रसंगी सुरेखा पुणेकर म्हणाल्या, पारंपरिक लावणीला मागणी कमी झाली आहे. पिढी दर पिढीचे विचार बदलतात. तसेच त्यांची जीवनशैली व आवडनिवडही बदलते. त्यामुळे कलेच्या क्षेत्रात बदलत्या काळानुसार बदल करणे क्रमप्राप्त ठरते. अन्यथा कालौघात कला आणि कलाकार दोघेही नामशेष होण्याचीच भिती अधिक असते. मध्यंतरी लावणी या कलेला चांगले दिवस आले होते. मात्र, सध्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या बदलामुळे रसिकांची अभिरुचीदेखील बदलत आहे. पारंपरिक लावणीऐवजी आता तरुणांसह महिलांनाही सिनेगितांवरील लावणी पहायला अधिक आवडत आहे.
जालन्यातील रसिक अधिक सुजान आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे आहेत. कुठल्याही कलाकाराला त्याच्या कलेसाठी दिलेली दाद ही अद्वितीय असते. कलाकाराची तिच संपत्ती असते. कलाकराने किती पैसे कमावले, यापेक्षा रसिक किती समाधानी झाले हीच त्याची पावती असते, असे पुणेकर म्हणाल्या. पूर्वी जालन्यात आल्यानंतर जागेअभावी गर्दी आणि दर्दी कमी असायचे. यंदा मात्र भव्य अशा स्व. कल्याणराव घोगरे स्टेडियमवर हा फेस्टिवल ठेवल्याने बुधवारी झालेल्या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पुणेकर यांनी आवर्जून सांगितले.