खडकाळ जमिनीवर फुलविली डाळिंबाची बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:56 AM2018-10-12T11:56:44+5:302018-10-12T11:57:50+5:30
यशकथा : युवा शेतकरी सुनील रंगराव पाटील यांनी तीन एकर खडकाळ माळरान जमिनीवर डाळिंबाची बाग फुलविली आहे.
- आत्माराम गायकवाड (पाचोरा)
वाडीशेवाळे (जि. जळगाव) येथील युवा शेतकरी सुनील रंगराव पाटील यांनी तीन एकर खडकाळ माळरान जमिनीवर डाळिंबाची बाग फुलविली आहे. यात त्यांनी ८२० रोपांची लागवड केली आहे. पाटील यांनी मे २०११ मध्ये ही लागवड केली. त्यांच्या बागेतील डाळिंबाला नाशिक व कोलकाता येथील मार्केटमध्ये चांगली मागणी आहे.
इतर व्यवसायापेक्षा पाटील यांनी शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरून विविध प्रयोग केल्याने यावर्षी त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. डाळिंबाची लागवड १०.१४ फूट अंतरावर केली असून, या बागेला ठिबक सिंचन संच, तसेच फवारणी यंत्र बसविले आहेत. डाळिंब बागेच्या लागवडीनंतर पाणीटंचाई, नैसर्गिक संकटे, तसेच तेल्यासारख्या रोगाच्या आक्रमणानंतरसुद्धा त्यांनी मोठ्या संयमाने बागेची निगा राखली आहे. कुठलीही तांत्रिक माहिती नसताना या पिकाबाबतची सर्व शास्त्रोक्त माहिती मिळवून त्यांनी बागेचे चांगले संगोपन केले आहे.
बागेचे खत व पाणीव्यवस्थापन
डाळिंब बागेत आंतरमशागत, पाणीव्यवस्थापन, बहरव्यवस्थापन, तसेच फळाची काढणी व विक्री याचे व्यवस्थापन ते करीत असतात. यावर्षी कडक उन्हापासून बागेचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी बागेवर सफेद नेटचे आच्छादन केले होते. त्यामुळे फळांचा उन्हापासून बचाव झाला, तसेच पाणी बचतीसाठी बागेतीलच गवत व काडीकचरा यांचा वापर करून नैसर्गिक आच्छादन केले होते. परिणामी, दुष्काळी परिस्थिती असतानादेखील त्यांच्या बागेत उत्कृष्ट फळे लगडली. डाळिंब हे पीक तसे खर्चिक व जोखमीचे पीक म्हणून ओळखले जाते. यावर्षी सध्या डाळिंबाचे दर घसरलेले असताना सुनील पाटील यांच्या डाळिंबाला उत्कृष्ट दर्जामुळे व्यापारी वर्गाकडून मोठी मागणी आहे.
यावर्षी बागेतून १० टन डाळिंबाची विक्री झाली आहे. पुढील वर्षी युरोपच्या बाजारात डाळिंबाची निर्यात करण्याचा त्यांचा मानस आहे. पाटील हे डाळिंब पिकासोबतच भाजीपाल्यातील टोमॅटो, कारली, गंगाफळ, मिरची या पिकांची उत्कृष्ट शेती करीत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना त्यांचा हा प्रयोग मार्गदर्शक ठरत आहे.
सुनील पाटील यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. वडिलोपार्जित खडकाळ शेतीत त्यांनी नंदनवन फुलविले आहे. त्यांचा खर्च अडीच लाखांपर्यंत झाला आहे. खर्च वजा जाता त्यांना सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. डाळिंब उत्पादक सुनील पाटील यांनी यानिमित्ताने लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे. शेतकऱ्यांनी केवळ नापिकीला दोष देत कपाळावर हात न मारता अधिक जोमाने कार्य केल्यास शेती निश्चितच फायद्याची आहे, असे पाटील यांनी सांगितले. त्यांची शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत.