CoronaVirus News: गंभीर कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची मात्रा; महाराष्ट्रात जगातील सर्वांत मोठी ट्रायल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 04:37 AM2020-06-14T04:37:29+5:302020-06-14T06:41:23+5:30

२१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये होणार प्रयोग

plasma therapy for severe corona patients Maharashtra to do largest trial in the world | CoronaVirus News: गंभीर कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची मात्रा; महाराष्ट्रात जगातील सर्वांत मोठी ट्रायल

CoronaVirus News: गंभीर कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची मात्रा; महाराष्ट्रात जगातील सर्वांत मोठी ट्रायल

Next

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिवीर या औषधाची ट्रायल सुरू होत असतानाच आता प्लाझ्मा थेरपीच्या साहाय्याने रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी राज्याला मिळाली आहे. २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हल कोरोना व्हायरस असेसमेंट) ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० रुग्णांवर उपचार होतील. याचे यश आजमावल्यावर या थेरपीची पुढील दिशा ठरेल.

एवढ्या व्यापक स्वरूपात या थेरपीची ट्रायल घेणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसनिर्मितीचे जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असले तरी ती लस आणखी काही महिने तरी दृष्टिपथात नाही. त्यामुळे औषधोपचारांच्या अन्य प्रयोगांच्या बरोबरीनेच प्लाझ्मा थेरपीच्या उपयुक्ततेच्या चाचण्या अनेक देशांमध्ये सुरू आहेत.

महाराष्ट्र सरकारला एप्रिल महिनाअखेरीस मर्यादित स्वरूपात या थेरपीसाठी परवानगी मिळाली होती. मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर येथे १६ रुग्णांवर त्या ट्रायल झाल्या असून, त्यात संमिश्र यश प्राप्त झाले आहे. प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या व्यापक स्वरूपात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नागपूर मेडिकल कॉलेजने राज्य सरकारच्या माध्यमातून सेंट्रल ड्रग अथॉरिटीकडे केली होती. दोन दिवसांपूर्वी नागपूरसह राज्यातील २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ते प्रयोग करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?
कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा देऊन त्यांच्या प्रतिकारशक्तीत या थेरपीच्या माध्यमातून सुधारणा केली जाते. प्लाझ्मामधील रक्तपेशींमध्ये अ‍ॅण्टिबॉडीजदेखील (प्रतिजैवीक) असतात. त्या आजारास कारणीभूत ठरणाऱ्या पेशींना प्रतिकार करून परतवून लावण्याचा प्रयत्न करतात. त्यात यश आले की पुन्हा तशाच रोगाचे आक्रमण झाले तर रक्तपेशी त्याला वेळीच प्रतिकार करतात.

गंभीर आजारावरील रुग्ण त्या थेरपीला प्रतिसाद देत असल्याचा दावा संशोधकांकडून केला जात आहे. कोरोनामुक्त झालेल्या आणि २८ दिवस विलगीकरणात असलेल्या व्यक्तीला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसतील तर त्याचे रक्त या थेरपीच्या चाचणीसाठी घेतले जाणार आहे. तत्पूर्वी त्या दात्याच्या तीन स्वॅब टेस्ट निगेटिव्ह याव्या लागतील. तसेच, त्या रक्तात कोरोनाला प्रतिकार करणाऱ्या अ‍ॅण्टिबॉडीजसुद्धा असाव्या लागतील.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायल आपण सुरू करतोय. ज्या रुग्णांमध्ये कमी गंभीर स्वरूपाची लक्षणे आहेत; परंतु, उपचारांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचा आजार गंभीर रूप धारण करू शकतो त्यांच्यासाठी ही थेरपी प्रभावी ठरत असल्याचे काही ठिकाणी संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यानुसार या ट्रायल महाराष्ट्रात केल्या जाणार आहेत. प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये २० ते ३० रुग्णांची निवड या थेरपीसाठी केली जाईल. त्यांच्यावरील उपचारांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर सखोल संशोधन होईल. त्यानंतर ही थेरपी उपयुक्त ठरत असेल तर त्याच्या वापराबाबतचे निर्णय घेतले जातील. - डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

Web Title: plasma therapy for severe corona patients Maharashtra to do largest trial in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.