भारतात सर्पदंश, धनुर्वात आजारांमध्ये प्लाज्मा ट्रीटमेंट यशस्वी; कोरोनाबाबत प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 04:03 PM2020-04-15T16:03:10+5:302020-04-15T16:09:27+5:30
कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांना होऊ शकतो उपयोग ..
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्तातील द्रवपदार्थ अर्थात प्लाज्मामधील आयजीजी अँटीबॉडीज काढून त्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये इंजेक्ट केल्यास कोरोनाविरोधातील उपचारांमध्ये यश मिळू शकते. भारतामध्ये प्रायोगिक तत्वावर ही पद्धत तपासली जात आहे. यासाठी विविध स्तरावर संशोधन सुरू आहे. यापूर्वी भारतात सर्पदंश, धनुर्वात अशा पद्धतीच्या आजारांमध्ये ही उपचारपद्धती वापरण्यात आली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाज्मा ट्रिटमेंट पद्धतीने उपचार करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिली. यापूर्वी इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये ही पद्धत यशस्वी झाली आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेत रक्तातील प्लाज्मा वापरून करण्यात आलेल्या उपचारांना तीन रुग्णांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. भारतात अद्याप याबाबत चाचपणी केली जात आहे. प्रायोगिक तत्वावर तपासणी सुरू असली तरी संपूर्ण यश मिळाल्याशिवाय कोरोनाच्या बाबतीत या उपचार पद्धतीवर शिक्कामोर्तब करता येणार नाही, असे मत वैद्यकीय तज्ञांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. केरळनंतर आता मुंबईत 'प्लाज्मा ट्रीटमेंट'च्या चाचणीला सुरुवात होणार आहे.
डॉ. मंदार परांजपे म्हणाले, 'रक्तामध्ये द्रवपदार्थ आणि पेशी असे दोन घटक असतात. त्यातील द्रवपदार्थ म्हणजेच प्लाज्मा. यामध्ये सर्व रसायने, संप्रेरके, जीवनसत्वे, पाणी असे घटक असतात. यामध्ये आयजीजी नावाच्या अँटिबॉडी तयार झालेल्या असतात. पूर्णपणे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्तामध्ये दोन-तीन महिन्यांपर्यंत आयजीजी राहू शकतात. त्यांचा उपयोग विषाणूचा सामना करण्यासाठी होऊ शकतो. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाज्मा काढून तो सध्या कोरोनामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांमध्ये इंजेक्ट करता येतात. तयार अँटिबॉडी विषाणूचा प्रतिकार करू शकतात. प्रायोगिक स्वरूपात ही उपचारपद्धती तपासून पाहिली जात आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांमध्ये हा प्रयोगाला संमिश्र यश मिळाले आहे. प्रयोगिक उपचार गंभीर अवस्थेतील रुग्णांवरच करून पाहिले जातात. मात्र, हा रामबाण उपाय ठरला असता, तर अमेरिकेतील शेकडो रुग्ण आतापर्यंत बरे होऊ शकले असते.'
डॉ. शिरीष प्रयाग म्हणाले, 'प्लाज्मा ट्रीटमेंट ही उपयुक्त उपचारपद्धत आहे. मात्र, कोरोना हा आजारच नवीन असल्याने तिथे ती यशस्वी होईल की नाही, याबाबत पुरावा लागणार आहे. पूर्वी टिटँनसमध्ये असे सिरम दिले जायचे. सर्पदंशामध्ये दिले जाणारे सिरमही प्लाज्मामधूनच तयार केले जाते. त्यामुळे प्लाज्मा ट्रीटमेंट यशस्वी होऊ शकते, असे अहवाल पाश्चिमात्य देशांमधून प्राप्त झाले आहेत. अत्यवस्थ रुग्णांमध्येच ही पद्धत तपासून पहिली जाईल. सामान्य कोरोनाबाधित रुग्ण आपोआप रिकव्हर होऊ शकतात.'
-------
प्लाज्मा ट्रीटमेंट उपचारपद्धतीची 'प्रायोगिक तत्वा'वर तपासणी सुरू आहे. मात्र, हा बिनधोक उपाय असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे त्याचा सरसकट वापर करता येणार नाही. रुग्णाच्या शरीरात १४ दिवसांनंतर आयजीजी तयार होऊ लागतात. रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे, याची खात्री आधी करून घ्यावी लागेल. त्याच्या शरीरात दोन महिन्यांपर्यंत आयजीजी राहू शकतात.
- डॉ. मंदार परांजपे, एमडी, पॅथॉलॉजिस्ट
------
ज्या देशांत लहानपणीच बीसीजी लस दिली जाते, त्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, अशी निरीक्षणे काही जणांकडून नोंदवण्यात आली आहेत. मात्र, याबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
- डॉ. शिरीष प्रयाग, संस्थापक,
इंडियन सोसायटी आॅफ क्रिटिकल केअर मेडिसिन,