वारी मध्ये होणार प्लास्टिक मुक्तीचा जनजागर
By Admin | Published: June 27, 2016 07:52 PM2016-06-27T19:52:08+5:302016-06-27T19:52:08+5:30
जगाला भक्तीचा आदर्श घालून देणारा संतश्रेष्ट ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यंदा अनोखा ठरणार आहे. पालखी मध्ये सहभागी होणा-या सुमारे
पुणे : जगाला भक्तीचा आदर्श घालून देणारा संतश्रेष्ट ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यंदा अनोखा ठरणार आहे. पालखी मध्ये सहभागी होणा-या सुमारे 15 ते 20 दिंडयांनी संपूर्ण दिंडी मध्ये प्लास्टिक न वापरण्याचे आश्वासन दिले आहे. या शिवाय वारी दरम्यान प्लास्टिक पिशव्यांची विक्री होऊ नये यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे दक्षता पथक, तसेच प्लास्टिक बंदीवर नियंत्रण ठेवणारे एक स्वतंत्र पथकही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली. या शिवाय या वर्षीच्या वारी मध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात येणार प्लास्टिक न वापरण्याबाबत हे पथक जनजगृती करणार आहे.
हे दोन्ही पालखी सोहळे बुधवारी (दि.29) रोजी दोन दिवसांच्या पुणे मुक्कामी येत आहेत. या कालावधीत लाखो भाविक पुण्यात मुक्कामी असतात, वारीसाठी आवश्यक असलेले दैनंदीन साहित्य हे वारकरी पुण्यातील बाजारपेठांमधून खरेदी करून सोबत घेऊन जातात. या शिवाय या कालावधीत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह वारक-यांना फळे तसेच अल्पोपहाराचे वाटप करणारे भाविकांची संख्याही अधिक असते. हे भाविक प्लास्टिक पिशव्यांमधून हे खाद्यपदार्थ वाटप करतात. त्यामुळे वारी शहरातून पुढे गेल्यानंतर प्लास्टिकच्या कच-याचे मोठे ढीग साचलेले असतात. तसेच हे प्लास्टिक मोठया प्रमाणात नाले तसेच चेंबर मध्ये टाकले गेल्याने शहरात नंतर पाऊस होताच अनेक ठिकाणी नाले तुंबण्याचे प्रकार घडतात. ही बाब लक्षात घेऊन गेल्या काही वर्षापासून महापालिकेकडून प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन दिंडी प्रमुख तसेच वारी मधील वारक-यांना केले जात आहे. त्याला प्रतिसाद देत सुमारे 15 ते 20 दिंडी प्रमुखांनी संपूर्ण वारीत कोठेही प्लास्टिक न वापरण्याचा निर्णय घेतला असून नुकत्याच जिल्हा प्रशासनाच्या झालेल्या वारी नियोजनाच्या बैठकीत तो महापालिकेस कळविला आहे. त्यामुळे या दिंडयांचा महापालिकेकडून विशेष सत्कारही करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. या शिवाय प्लास्टिक विक्रेत्यांवर तसेच बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या वारी मध्ये विक्री करणा-या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पालिकेची उपद्रव दक्षता पथकासह प्लास्टिक निर्मूलन पथकही दोन दिवस तैनात करण्यात येणार आहे.