प्लॅस्टिकच्या हद्दपारीला आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:11 AM2018-06-23T01:11:24+5:302018-06-23T01:11:33+5:30
राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास शनिवारपासून सुरुवात होणार आहे.
पुणे : राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास शनिवारपासून सुरुवात होणार आहे. प्लॅस्टिक आढळल्यास दंड करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने आरोग्य निरीक्षक तसेच अन्य काही अधिकारी अशा तब्बल १७० जणांची फौजच तयार केली आहे.
सर्वसामान्य नागरिक किंवा उत्पादक अशा कोणालाही आता या कायद्याचा भंग करता येणार नाही. तपासणीत सापडले, की थेट दंड करण्यात येणार असून त्यातून सुटका होणार नाही. सरकारची परवानगी नाही अशा सर्व उद्योग-व्यवसायांवरही प्लॅस्टिक वापराचा आरोप ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.
शहरी विभागात या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारने महापालिकेला दिली आहे. त्याची दखल घेऊन महापालिकेने आरोग्य विभागातील १७० आरोग्य निरीक्षक व सहायक आरोग्य निरीक्षक तयार केले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्लॅस्टिक वापरावर लक्ष ठेवायचे आहे. पहिल्यांदा प्लॅस्टिक पिशवी वापरली तर ५ हजार, दुसऱ्या वेळी १० हजार रुपये दंड, तिसºया वेळी मात्र थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल. दुकानदार किंवा सामान्य नागरिक यांच्यासाठी समान दंड तसेच समान शिक्षा आहे. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत एकूण ४२ टन प्लॅस्टिक जप्त केले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांनी दिली. १७० जणांची १७ पथके तयार करण्यात आली आहेत.
याशिवाय सरकारची दोन पथके असतील. त्यांच्याकडून शहरात पाहणी केली जाईल. प्लॅस्टिकच्या पिशवीपासून ते कोणत्याही स्वरूपातील प्लॅस्टिक वापरताना आढळल्यास कारवाई केली जाईल़
>कारवाई करावी लागणार
महापालिकेने नागरिकांनी त्यांच्याजवळ असलेले प्लॅस्टिक जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी केंद्रे सुरू केली होती. काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला, काही ठिकाणी नाही. आता न्यायालयाने दिलेली मुदत संपली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारने महापालिकेला दिली आहे. त्यामुळे आता त्याचे काटेकोर पालन केले जाणार आहे. नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळून महापालिकेला सहकार्य करावे.
- मुक्ता टिळक,
महापौर, पुणे महापालिका
>सजावटीवर संक्रांत
प्लॅस्टिकची फुले, सजावटीचे साहित्य, थर्माकोल याचा गणेशोत्सव किंवा सजावटीसाठी फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो; मात्र आता त्याचा वापर करून सजावट करता येणार नाही. थर्माकोलच्या उत्पादनावरच बंदी घालण्यात आली आहे.
यांच्यासाठी आहे बंदी
निमसरकारी संस्था, शैक्षणिक संस्था, क्रीडासंकुल, चित्रपट, नाट्य गृहे, औद्योगिक घटक, सभारंभाची ठिकाणे, धार्मिक स्थळे, हॉटेल, ढाबे, दुकानदार, मॉल, किरकोळ विक्रेते, समुद्र किंवा नदी किनारे, रेल्वे, सर्व सार्वजनिक ठिकाणे यांच्यासह सर्वसामान्यांसाठी बंदी आहे.
याला आहे बंदी
सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या
प्लॅस्टिक किंवा थर्माकोलपासून तयार करण्यात येणारी ताटे, कप, प्लेट, काटे, वाट्या, चमचे,
हॉटेलमधील अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारी भांडी, स्ट्रॉ,
द्रव पदार्थ साठविण्यासाठीच्या पिशव्या.