प्लास्टीकमुक्ती दिखाव्यापुरतीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 03:05 AM2017-01-17T03:05:45+5:302017-01-17T03:05:45+5:30

पालिकेचे प्लास्टीकमुक्ती अभियान दिखाव्यापुरतेच असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे.

Plastikuktai only for showing! | प्लास्टीकमुक्ती दिखाव्यापुरतीच!

प्लास्टीकमुक्ती दिखाव्यापुरतीच!

Next

नामदेव मोरे,

नवी मुंबई- पालिकेचे प्लास्टीकमुक्ती अभियान दिखाव्यापुरतेच असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. शहरात रोज तब्बल ६० ते ८० टन प्लास्टीक कचरा तयार होत आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकचा वापर सर्रास सुरू असून मॉलपासून दुकानदारांपर्यंत शुल्क न आकारता प्लास्टीक पिशव्या दिल्या जात आहेत. प्लास्टीकमुक्तीचे आदेश धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडे सक्षम यंत्रणाच नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीमध्ये चांगले काम सुरू असल्याचा दिखावा करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. अनधिकृत बांधकाम व फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका लावला पण एकही ठिकाण फेरीवालामुक्त करता आलेले नाही. ८ हजार अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या पण सर्वच्या सर्व पुन्हा सुरू झाल्या. ओला व सुका कचरा, पाण्याचा अपव्यय थांबविण्याचे अभियानही फसले आहेत. कायमस्वरूपी यंत्रणा बसविण्यापेक्षा दिखावेगिरीचे काम सुरू झाले असून त्यामध्ये आता प्लास्टीकमुक्त नवी मुंबई अभियानाची भर पडली आहे. पालिकेने ८ जानेवारीला शंकर महादेवन, जुही चावला व अनेक चित्रपट कलावंतांच्या उपस्थितीमध्ये प्लास्टीकमुक्त अभियान राबविण्यात आले. विद्यार्थी, सामाजिक संस्थांच्या मदतीने २४ मेट्रिक टन प्लास्टीक गोळा केले. गोळा केलेले प्लास्टीक तुर्भे डंपिंग ग्राऊंडवर नेण्यात आले. तेथे डांबरीकरणासाठी आवश्यक प्लास्टीक दाणे बनविण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली होती. पण प्रत्यक्षात प्लास्टीक दाणे बनविण्याचा प्रकल्प पालिकेकडे नाही. प्लास्टीकचा पुनर्वापर करण्याची काहीच यंत्रणा नाही. यामुळे जमा झालेल्या कचऱ्यापैकी अर्धा कचरा पनवेलमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या कारखान्याला विकण्यात आला आहे. उरलेला कचरा क्षेपणभूमीवरच पडला आहे. यामुळे डांबरीकरणासाठी प्लास्टीक दाणे बनविण्याची घोषणा खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेने राबविलेल्या एक दिवसीय अभियानामध्ये २४ टन प्लास्टीक कचरा जमा झाला होता. वास्तविक शहरामध्ये रोज ६० ते ८० टन प्लास्टीक कचरा तयार होत आहे. यामुळे पालिकेने विशेष अभियान राबवूनही सर्व कचरा संकलित करता आलेला नाही. एक दिवसाचे अभियान झाल्यानंतर पुन्हा प्लास्टीक संकलित कसे करायचे याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. शहरात अनेक ठिकाणी प्लास्टीकमुक्तीचे फलक लावले आहेत. पण नियम धाब्यावर बसवून कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मॉल व इतर दुकानदारांनीही प्लास्टीक पिशव्या मोफत देणे बंद करणे आवश्यक आहे. एकूणच प्लास्टीकला पर्यायी पिशव्या उपलब्ध नसल्याने हे अभियान फसले आहे.
विभाग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
प्लास्टीकचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. वाशीचे विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके वगळता एकही विभाग अधिकारी प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करत नाही.
तुर्भे विभाग कार्यालयाच्या क्षेत्रातील एपीएमसी मार्केट, मॅफ्को, तुर्भे जनता मार्केट, तुर्भे नाका परिसरात नवी मुंबईतील सर्वात जास्त प्रतिबंधात्मक प्लास्टीक पिशव्यांचा वापर होत असून तेथील विभाग अधिकारी अंगाई साळुंखे कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
जो पर्यंत नियमीतपणे कडक कारवाई होणार नाही तो पर्यंत प्लास्टीक मुक्ती शक्य नसल्याचे बोलले जात आहे.
>प्लास्टीक दाण्याची फक्त घोषणा
प्लास्टीकमुक्त अभियान राबविताना जमा होणाऱ्या कचऱ्यापासून डांबरीकरणासाठी आवश्यक प्लास्टीक दाणे तयार केले जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. पण प्रत्यक्षात अशाप्रकारे प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प महापालिकेच्या क्षेपणभूमीवर नाही. यामुळे जमा झालेला कचऱ्यापैकी अर्धा कचरा पनवेलमध्ये नवीन सुरू होत असलेल्या कारखान्याला विकला आहे. पालिकेची ही योजनाही घोषणाबाजीच ठरली आहे.
>प्लास्टीकमुक्तीसाठी हव्यात या उपाययोजना
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्यांवर हवी रोज कारवाई
मोफत प्लास्टीक पिशवी देणाऱ्या व्यावसायिकांवर हवी कारवाई
कमी जाडीच्या पिशव्या विकणाऱ्या होलसेल दुकानांवर कारवाईची गरज
शहरातील प्लास्टीकचा कचरा उचलण्यासाठी सक्षम यंत्रणा हवी
प्लास्टीक पिशव्यांना पर्यायी कागदी व इतर पिशव्यांची उपलब्धता आवश्यक
व्यापाऱ्यांची बैठक घेवून त्यांना प्लास्टीकमुक्तीसाठी आवाहन करावे
नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळून प्लास्टीक कमीत कमी वापरावे

Web Title: Plastikuktai only for showing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.