रस्त्यांवर 'रात्रीस खेळ चाले'
By Admin | Published: September 1, 2016 10:43 PM2016-09-01T22:43:43+5:302016-09-01T22:43:43+5:30
गणेशोत्सव मंडळांची नाराजी आणि टीकास्त्रामुळे अखेर जाग आलेल्या महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - गणेशोत्सव मंडळांची नाराजी आणि टीकास्त्रामुळे अखेर जाग आलेल्या महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे. गणरायाच्या आगमनाला अवघे ७२ तास उरले असल्याने खड्डे भरण्याचे काम रात्रंदिवस सुरु आहे. तरीही खड्ड्यांची संख्या मात्र वाढतच असल्याचे दिसून आहे.
खड्डे बुजविण्याची मुदत दोनवेळा उलटून गेल्यानंतरही मुंबईतील रस्ते खड्ड्यात आहे. २१ आॅगस्ट रोजी पहिली डेडलाईन संपली, तरीही रस्ते खड्ड्यातच असल्याने अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या जोखमीवर गणेश मूर्ती आणली़ त्यानंतर २६ आॅगस्टची डेडलाईनही संपली तरी खड्डे कायम असल्याने सार्वजनिक मंडळांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या रस्त्यांवर रात्रीस खेळ चाले याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर पालिकेने आता तीन दिवसांमध्ये गणेश आगमनाचे मार्ग खड्डेमुक्त करण्याची तयारी केली आहे़ त्यानुसार बंदर पाखाडी रोड, टँक लेन, कांदिवली पश्चिम आणि दादा सावे रोड, समता नगर पोलिस स्थानक रोड कांदिवली पूर्व, हिंदमाता उड्डाणपूल, समर्थ रामदास स्वामी मार्ग, कुर्ला येथील एस़जी़ बर्वे रोड, मेहताब लेन जंक्शन या ठिकाणी रात्रीच्या वेळेत खड्डे भरण्यात आले आहेत.