महापालिकेकडून खेळाडूंना मैदानात नो एन्ट्री
By admin | Published: January 16, 2017 02:58 AM2017-01-16T02:58:14+5:302017-01-16T02:58:14+5:30
शाळेच्या व्यतिरिक्त मैदाने स्थानिक क्रीडाप्रेमी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या सिडकोच्या सूचनांना महापालिकेने हरताळ फासला
नवी मुंबई : शाळेच्या व्यतिरिक्त मैदाने स्थानिक क्रीडाप्रेमी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या सिडकोच्या सूचनांना महापालिकेने हरताळ फासला आहे. नेरूळ, वाशीसह अनेक ठिकाणी पालिका शाळांच्या मैदानाचा उपयोग स्थानिक नागरिकांना करता येत नाही. मैदानबंदीच्या या आदेशामुळे क्रीडाप्रेमी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
नवी मुंबईमधील ज्या मूळ गावांमध्ये खेळण्यासाठी मैदानांचे पुरेसे भूखंड राखून ठेवले नाहीत त्यामध्ये नेरूळचाही समावेश आहे. मैदानांच्या कमतरतेमुळे गावातील तरुण महापालिका शाळेच्या मैदानामध्ये सकाळी व सायंकाळी खेळण्यासाठी उपयोग करतात; पण महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश असल्याचे कारण देऊन शिक्षण मंडळाने मैदानांमध्ये स्थानिक खेळाडूंना प्रवेश देणे बंद केले आहे. प्रवेशद्वाराला टाळे लावण्यात आले आहे. विनंती करूनही खेळण्यास परवानगी दिली जात नाही. यामुळे परिसरातील तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळा सुटल्यानंतर मैदानांचा वापर स्थानिक तरुणांना करता यावा, अशी अट सिडकोने भूखंडाचे वितरण करताना घातली आहे. खासगी शाळांनाही ते बंधनकारक असताना पालिका मात्र खेळाडूंना मैदानबंदी करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
नेरूळ प्रमाणे वाशीमध्येही पालिका शाळांच्या मैदानामध्ये स्थानिक खेळाडूंना प्रवेश दिला जात नाही. सुरक्षारक्षक मैदानामध्ये पाऊलही ठेवू देत नाहीत. जुईनगरमध्ये शाळेच्या मैदानाभोवती संरक्षण भिंतीचे काम सुरू झाले आहे. यामुळे संरक्षण भिंत झाल्यानंतर तेथे खेळता येणार नाही. महापालिकेच्या या निर्णयाविषयी शहरवासीयांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त मैदाने खुली केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
>खासगी व महापालिका शाळांची मैदाने शाळेच्या वेळेव्यतिरिक्त स्थानिक तरूणांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिली पाहिजेत; पण नेरूळमधील मैदानाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले आहे. हा खेळाडूंवर अन्याय असून मैदाने पूर्ववत खुली करण्याची मागणी आम्ही केली आहे.
- गिरीश म्हात्रे,
नगरसेवक, राष्ट्रवादी काँगे्रस
>खासगी शाळांनाही ते बंधनकारक असताना पालिका मात्र खेळाडूंना मैदानबंदी करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.