महापालिका क्षेत्रातील मैदाने बुक
By admin | Published: May 14, 2017 01:57 AM2017-05-14T01:57:06+5:302017-05-14T01:57:06+5:30
पनवेल महापालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला
वैभव गायकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. शुक्रवारी, १२ मे रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. २० प्रभागांत होणाऱ्या ७८ जागांसाठीच्या निवडणुकीत भाजपा, शेकाप, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह अनेक लहान पक्षांचा समावेश आहे. काही दिवसांतच पक्षांच्या प्रचारसभेला सुरुवात होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच मोठ्या पक्षांनी मैदाने बुक केली असल्याने लहान पक्षांनी सभा घ्यायच्या तरी कुठे? असा प्रश्न पडला आहे.
पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे. विशेष म्हणजे, या महापालिका क्षेत्राची व्याप्ती काही वर्षांत मुंबई महापालिकेपेक्षा मोठी होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा डोळा या महानगरपालिकेवर आहे. महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत आपलीच सत्ता यावी, असे सर्व पक्षांना वाटते. २४ मे रोजी मतदान होणार असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांचे राजकीय शिलेदार पनवेलमध्ये उतरणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. याकरिता मोठ्या पक्षांनी काही दिवसांपूर्वीच खारघरसह पनवेलमधील महत्त्वाची आणि मोठी मैदाने बुक केली आहेत. अशा परिस्थितीत लहान पक्षांनी सभा घ्यायच्या कुठे? असा प्रश्न पडला आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या मागे एक मोठे मैदान आहे आणि उर्वरित सर्व मैदाने सिडको नोडमध्ये आहेत. सिडको प्रशासनाकडे ३०पेक्षा जास्त मैदानांचा समावेश आहे.
सिडको नोड अद्याप पालिकेकडे हस्तातंरित करण्यात आले नसल्याने सिडकोकडे या मैदांनाची मालकी आहे. सिडकोकडूनच यासंदर्भात परवानगी घेणे बंधनकारक आहे.
मात्र, प्रमुख पक्षांनी ही प्रक्रि या लवकरच पार केली असल्याने, लहान पक्षांची ऐन निवडणुकीत गोची झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
>पालिका व सिडको क्षेत्रातील मैदाने बुक करणे, असा काहीच प्रकार नाही. ज्यांनी प्रथम या मैदानांच्या सभेसाठी प्रक्रि या पूर्ण केली आहे. त्याला ते मैदान मिळणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, अशा प्रकारे ही मैदाने अर्जदारांना मिळाली आहेत. जर का कोणी खोटे कारण सांगून मैदाने मुद्दाम अडकविण्याचा प्रयत्न केला असेल, तर ते आमच्या निदर्शनास आणून दिल्यास आम्ही नक्कीच कारवाई करू.
- जे. लेंगरेकर
परवाना उपायुक्त,
पनवेल महानगरपालिका
>खारघरसारख्या शहरात आम्हाला मैदाने मिळत नाहीत. आम्ही प्रशासनाकडे विचारणा केली असता, सर्व मैदाने बुक झाली असल्याचे समजते. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रमुख मोठ्या पक्षांचा समावेश असल्याचे समजते. त्यामुळे आम्ही सभा रस्त्यावर घ्यायच्या का? असा प्रश्न आहे.
- केसरीनाथ पाटील,
रायगड जिल्हा चिटणीस, मनसे
>पनवेल महापालिकेत भाजपा-शेकाप अशी लढत आहे. भाजपा आरपीआय आठवले गटाला सोबत घेऊन लढत आहे, तर शेकापने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाआघाडी स्थापन केली आहे. भाजपाने प्रचारात आघाडी घेतली असून, प्रचार सभेचा कार्यक्र मदेखील जाहीर केला आहे. २१ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खारघरमध्ये सभा होणार आहे.