नाटककार व बालरंगभूमीचे प्रणेते

By admin | Published: January 1, 2015 02:04 AM2015-01-01T02:04:10+5:302015-01-01T02:04:10+5:30

नवीन वर्षात नाट्यक्षेत्राशी संबंधित अशी स्लम थिएटरची संकल्पना आम्ही प्रत्यक्ष अमलात आणत आहोत आणि यात सहभागी होणाऱ्या मुलांना नाट्यक्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

Playwright and childhood girl | नाटककार व बालरंगभूमीचे प्रणेते

नाटककार व बालरंगभूमीचे प्रणेते

Next

नवीन वर्षात नाट्यक्षेत्राशी संबंधित अशी स्लम थिएटरची संकल्पना आम्ही प्रत्यक्ष अमलात आणत आहोत आणि यात सहभागी होणाऱ्या मुलांना नाट्यक्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या क्षेत्रापासून वंचित असलेल्या मुलांचा एकूण कल कसा आहे, ते अजमावून नवीन विचारांचा शोध आम्ही घेत आहोत. याची सुरुवात आम्ही आधीच केली आहे. रंगभूमीच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या झोपडपट्टीतील मुलांवर आमचा फोकस आहे आणि त्यांच्या आजूबाजूचा परिसर, त्यांना जवळचे वाटणारे विषय, या विषयावर विचार करण्याची त्यांची पद्धत, एखाद्या विषयाच्या ते किती खोलात जात आहेत, त्यांची निरीक्षणशक्ती यावर आमचा भर आहे. एखादी स्क्रि प्ट त्यांनी बसवल्यानंतर केवळ मार्गदर्शनाचा हात आम्ही पुढे करीत आहोत. या स्लम थिएटरचा प्रारंभच जानेवारीतील स्पर्धेच्या माध्यमातून होत असून, नववर्षात मराठी रंगभूमीसाठी हा नवा बदल असू शकेल.
या वंचित मुलांना स्वत:चा आवाज सापडावा, अशी मूळ संकल्पना आहे. यातून पुढे-मागे या मुलांना योग्य मार्ग मिळेल, आत्मविश्वास वाढेल असे आम्हाला वाटते. मुले याद्वारे स्वत:कडे वेगळ्या आणि चिकित्सक वृत्तीने पाहू शकतील. आपण हे करू शकतो, असा मुलांना विचार करायला लावण्याचा भाग यात अधिक आहे. आम्ही मिळून-मिसळून आणि एकत्रितपणे काही करू शकतो याची जाणीव मुलांना यातून होईल. मोलमजुरी करणाऱ्या, वंचितांच्या मुलांना असलेली अभिनयाची आवड यातून आम्हाला जाणवली. कल्पनाही करू शकत नाही, इतक्या वेगवेगळ्या प्रकारे ते व्यक्त होतात. समोर आलेल्या अडचणीतून मार्ग कसा काढायचा, हे यातून मुले शिकतात. सध्या मुले स्वत: या माध्यमातून विचारप्रवृत्त होऊ शकतील. आम्ही जेव्हा ही संकल्पना झोपडपट्टीत जाऊन मांडली, तेव्हा हातावर पोट असणारे, मोलमजुरी करणारे या मुलांचे पालक प्रथम यात मुलांना पाठवण्यास तयार नव्हते; विशेषत: मुलींना यात भाग घेण्यास पालकांकडून आडकाठी होत होती. मग इथल्या मुलांनीच ‘बाहर जाना मना हैं’ हा विषय शोधला. आम्हाला हेच तर अभिप्रेत आहे.
आमच्या बालनाट्य संस्थेला ५२ वर्षे झाली आणि या कालावधीत २५ पूर्ण लांबीच्या नाटकांची निर्मिती करीत त्यांचे १५०० प्रयोग आम्ही केले. बालरंगभूमीविषयी समाजाची असलेली अनास्था, यंत्रणांकडून असलेला प्रोत्साहनाचा अभाव असा प्रकार एकीकडे असताना केवळ मुलांचा उत्साहवर्धक प्रतिसाद हाच मोबदला मानून आम्ही हे कार्य करीत आहोत. अनेक शाळांतून मुलांकडून अभिनय, नेपथ्य, वेषभूषा अशा नाटकाशी संबंधित क्षेत्रांबाबत तयारी करून घेतली जाते आणि याद्वारे एक सुविहित प्रयोग मुले सादर करतात. पण त्यांना स्वत:ला जे म्हणायचे आहे, ते त्यातून क्वचितच व्यक्त होते. पांढरपेशा समाजाच्या वर्चस्वामुळे तळागाळातील वंचित मुलांपर्यंत रंगभूमी पोहोचावी, या उद्देशाने आम्ही नवीन वर्षात कार्यरत राहू. (शब्दांकन : राज चिंचणकर)

- रत्नाकर मतकरी

 

Web Title: Playwright and childhood girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.