नाट्यगृहांच्या सुधारणेसाठी नाट्यप्रेमी एकत्र
By Admin | Published: July 3, 2017 07:58 PM2017-07-03T19:58:22+5:302017-07-03T19:58:22+5:30
नाट्यगृहांची दुरवस्था याविषयी लिहून आणि बोलून अनेक वर्षे उलटली तरी मनपा कधी याबद्दल गांभीर्याने विचार करताना दिसत नाही
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 3 - शहरातील नाट्यगृहांची दुरवस्था याविषयी लिहून आणि बोलून अनेक वर्षे उलटली तरी मनपा कधी याबद्दल गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. एवढ्या वर्षांची निष्क्रियता पाहूनही निराश न होता पुन्हा एकदा प्रशासनासमोर नाट्यगृहांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी शहरातील नाट्यक्षेत्रातील कलावंत आणि नाट्यरसिक रविवारी एकत्र आले.
संत एकनाथ रंगमंदिर येथे रविवारी (दि.२) नाट्यप्रेमींच्या झालेल्या बैठकीत मनपांतर्गत येणाऱ्या दोन्ही नाट्यगृहांची बिकट अवस्था समोर आणून त्यांची सुधारणा करण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा करण्यात आली. मनपा चालवीत असलेल्या संत तुकाराम नाट्यगृह आणि संत एकनाथ रंगमंदिर या दोन नाट्यगृहांमध्ये सुविधांचा अभाव आहे. वेळोवेळी मनपाला याबाबत सांगूनही काही विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. अस्वच्छता, तुटलेल्या खुर्च्या, मोडका रंगमंच, असुविधाजनक ग्रीन रूम, स्वच्छतागृहांची दुरवस्था, जुनी ध्वनियंत्रणा व प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अशा अनेक समस्यांनी शहरातील या नाट्यगृहांना ग्रासलेले आहे. शाळा- कॉलेजच्या गॅदरिंगसाठी सूट देऊन नाट्यगृह उपलब्ध करून देण्यात येते. विद्यार्थी खुर्च्यांवर उभे राहून नाचतात, त्यामुळे खुर्च्या तुटतात. याची भरपाईदेखील दिली जात नाही. यावर कुठे तरी नियंत्रण राहिले पाहिजे, अशी मागणी नाट्यप्रेमींनी केली आहे.
लवकरच मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर आणि विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना याबाबत निवेदन देऊन प्रत्यक्ष परिस्थिती दाखविण्यात येणार आहे. नाट्यगृहांचे हाल पाहून अनेक व्यावसायिक नाटक कंपन्या व कलावंत शहरात प्रयोग करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे स्थानिक रसिक दर्जेदार कलाकृती पाहण्यापासून मुकतात. कला-संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेल्या आपल्या शहराची ही ओळख आता ओसरू लागल्याची खंत नाट्यकर्मींनी व्यक्त केली. यावेळी शीतल रुद्रवार, सचिन नेवपूरकर, संदीप सोनार, राजू परदेशी, पवन गायकवाड, विशाखा रूपल, प्रसाद साडेकर, राजेंद्र जोशी, हेमंत अष्टपुत्रे, सारंग टाकळकर, माया गोस्वामी आणि नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्यक्ष अभिनेत्यांनी केली होती तक्रार...
रंगभूमीची अशी वाताहत झालेली पाहून अनेक कलावंतांनी आवर्जून येथील अनास्थेविषयी भाष्य केले होते. मागच्या वर्षी तर प्रशांत दामले यांनी स्वत: प्रयोगापूर्वी नाट्यगृहात झाडूने सफाई केली होती. सुयश टिळकने नाट्यगृहाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. याबरोबरच जितेंद्र जोशी, सौरभ गोखले, प्राजक्ता माळी आदी कलाकारांनी येथे आल्यावर नाट्यगृहांच्या दुरवस्थेविषयी चिंता व्यक्त केली आहे.
जीएसटीमुळे नाटकाचे तिकीट दर वाढले
वस्तू व सेवा करांतर्गत (जीएसटी) नाटकांच्या तिकिटावर आता १८ टक्के कर लागणार आहे. म्हणजे ३०० रुपयांच्या तिकिटावर ५४ रुपये कर बसेल. म्हणजे तिकीट होणार ३५४ रुपये. जीएसटी लागू झाल्यामुळे नाट्यरसिकांच्या खिशाला थोडाफार भार सोसावा लागणार आहे. महागडे तिकीट काढून येणाऱ्या प्रेक्षकांना जेव्हा त्या बदल्यात सुविधा मिळत नसतील तर ते पुन्हा येणे पसंत करणार नाहीत.