रावलांना मंत्रीपद दिले म्हणून मुख्यमंत्र्यांविरुद्ध याचिका
By admin | Published: July 7, 2016 09:01 PM2016-07-07T21:01:52+5:302016-07-07T21:01:52+5:30
दादासाहेब रावल बँकेतील गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आमदार जयकुमार रावल यांना मंत्रीमंडळात स्थान देणे चुकीचे आहे. म्हणून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. ७ : दादासाहेब रावल बँकेतील गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आमदार जयकुमार रावल यांना मंत्रीमंडळात स्थान देणे चुकीचे आहे. म्हणून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांनी लोकमतला दुरध्वनीवरुन दिली.
दोंडाईचा येथील दादासाहेब रावल बँकेतून आमदार रावल आणि त्यांच्या दहा ते बारा नातेवाइकांना विनातारण, अपुरे तारण, बोगस तारण देऊन दहा ते बारा कोटींचे कर्ज देण्यात आले़ ते कर्ज थकविल्यामुळे बँक अवसायनात गेली़ ठेवीदारांचे आर्थिक नुकसान झाले़ सध्या याप्रकरणी न्यायालयात कामकाज सुरू आहे़
शेवाडे व बह्याणे आराळे सिंचन प्रकल्प राबविताना बुडीत खाली कुठलीही जमीन गेलेली नसताना शासनाकडून नुकसानभरपाई लाटली, अशा प्रकरणात आमदार रावल अडकलेले आहे. अशा व्यक्तीला मंत्रीमंडळात स्थान देणे चुकीचे आहे. म्हणून याविरोधात आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करणार आहोत, असे डॉ.हेमंत देशमुख यांनी सांगितले.
अंजली दमानिया आल्यानंतर मुंबई आंदोलन
तसेच याविरोधात अंजली दमानिया परदेशातून परत आल्यावर मुंबईत आंदोलन छेडण्यात येईल. यात राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे सर्वच नेतेमंडळी सहभाग घेतील, असेही डॉ.हेमंत देशमुख म्हणाले.