शासकीय तारांमधून तंतुवाद्यांच्या आनंदलहरी...

By admin | Published: November 26, 2015 11:04 PM2015-11-26T23:04:51+5:302015-11-27T00:42:32+5:30

शासनाकडून हस्तकलेचा दर्जा : उद्योग विभागातर्फे मिरजेत संगीतवाद्य निर्मिती केंद्र होणार

The pleasure of the fibers in the government's wires ... | शासकीय तारांमधून तंतुवाद्यांच्या आनंदलहरी...

शासकीय तारांमधून तंतुवाद्यांच्या आनंदलहरी...

Next

सदानंद औंधे -- मिरज -राज्यात मिरजेत एकमेव असलेल्या तंतुवाद्य निर्मितीस हस्तकलेचा दर्जा देऊन राज्य शासनाच्या लघुउद्योग विकास महामंडळातर्फे क्लस्टर योजनेअंतर्गत मिरजेत संगीतवाद्य निर्मिती केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. संगीतवाद्य निर्मिती केंद्रास मदतीची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. त्यामुळे प्रश्नांच्या स्वरांना छेद देऊन शासकीय मदतीने आनंदलहरी प्रकटणार आहेत.
महागाई, कच्च्या मालाचे वाढते दर, तंतुवाद्य निर्मितीतून मिळणारे अपुरे उत्पन्न, इलेक्ट्रॉनिक वाद्यांचे आक्रमण अशा विविध कारणांमुळे अडचणीत असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य निर्मिती कलेस आता शासनाची मदत मिळणार आहे. देशातील दिग्गज कलाकार मिरजेत तयार झालेली सतार व तंबोऱ्याचा वापर करतात. मिरजेची सतार व तंबोऱ्यास परदेशातही मागणी आहे. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील या तंतुवाद्य निर्मिती व्यवसायात कारागीरांच्या पाच पिढ्या आहेत. मिरजेतील तंबोरा व सतार या दर्जेदार तंतुवाद्यांनी संपूर्ण देशात व परदेशातही लौकिक मिळविला आहे. तंतुवाद्यांचा मधुर व सुरेल आवाज, टिकावूपणा, सुबकता यामुळे मिरजेतील सतार व तंबोऱ्यांना विविध मान-सन्मान मिळाले आहेत. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत कला टिकविण्याचे श्रेय तंतुवाद्य कारागीरांनाही आहे.
मात्र तंतुवाद्य निर्मिती अत्यंत कष्टाचे काम आहे. महिन्याभरात केवळ चार ते पाच सतारी किंवा तंबोऱ्यांची निर्मिती होत असल्याने, तुटपुंजे उत्पन्न मिळते. त्यामुळे कारागीरांची संख्या रोडावत आहे.
कारागीरांची नवी पिढी या व्यवसायात येण्यास इच्छुक नाही. तंतुवाद्य कला टिकविण्यासाठी व संवर्धनासाठी तंतुवाद्य निर्मितीला हस्तकलेचा दर्जा द्यावा, कारागीरांना निवृत्तीवेतन, व्यवसायासाठी जागा, आर्थिक मदत व आरोग्य सुविधा देण्याच्या मागणीसाठी तंतुवाद्य कारागीरांचा पाठपुरावा सुरू होता. आता राज्य शासनाने या व्यवसायास हस्तकलेचा दर्जा दिल्यामुळे शासकीय योजना व सवलती मिळणार आहेत. शास्त्रीय संगीताचा आधार असलेला तंतुवाद्य निर्मिती व्यवसाय टिकविण्यासाठी आता लघुउद्योग विकास महामंडळाची मदत मिळणार आहे.
मिरजेतील कोल्हापूर रस्ता, सावळी रस्ता, सांगली रस्त्यावर एसटी वर्कशॉपजवळ व कवलापूर येथील शासनाच्या जागेत संगीत वाद्य निर्मिती केंद्राची उभारणी करून तंतुवाद्य कारागीरांसाठी दुकाने व वाद्य निर्मितीसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. क्लस्टर योजनेअंतर्गत मिरजेतील संगीत वाद्य निर्मिती केंद्रासाठी पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
भूमी संपादन होताच आणखी निधी उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे तंतुवाद्य कारागीरांना दिलासा मिळाला आहे.


सामूहिक कलासतार व तंबोरा बनविण्यासाठी कोणी भोपळा कापतो, कोणी तराफा जोडतो, कोणी तारा चढवितो, कोणी नक्षीकाम करतो, कोणी वाद्याचे ट्यूनिंग करतो. सतार, तंबोऱ्याची निर्मिती ही सामूहिक कला आहे. वाद्याचे ट्यूनिंग करणे किवा स्वर जुळविणे तर अत्यंत कौशल्याचे काम आहे. ही सर्व कामे आता संगीत वाद्य निर्मिती केंद्रात होणार आहेत.

मिरजेतील तंतुवाद्यांना कोलकाता व लखनौ येथील स्वस्त दराच्या तंतुवाद्यांशी स्पर्धा करावी लागते. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत तंतुवाद्य व्यवसायाला शासनाचा आधार मिळाला आहे.

Web Title: The pleasure of the fibers in the government's wires ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.