संमेलनाने सर्वसामान्यांना दिला सामाजिक, वाड़मयीन क्षेत्राचा आनंद
By admin | Published: February 5, 2017 09:03 PM2017-02-05T21:03:19+5:302017-02-05T21:25:55+5:30
डोंबिवलीत झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने सर्वसामान्यांना सामाजिक आणि वाड़मयीन क्षेत्राचा आनंद मिळवून दिला
Next
>बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
पु. भा. भावे साहित्यनगरी डोंबिवली, दि. ५ - डोंबिवलीत झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने सर्वसामान्यांना सामाजिक आणि वाड़मयीन क्षेत्राचा आनंद मिळवून दिला, असे संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आपल्या समारोपाच्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.
परिसंवाद, कविसंमेलने, मुलाखती, कथाकथन यांच्या माध्यमातून डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलामधील पु. भा. भावे साहित्यनगरीत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साहित्याच्या जागराचा आज संध्याकाळी दिमाखात समारोप झाला. यावेळी राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार, अतिरिक्त आयुक्त घरत, महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे, संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या समारोपाच्या भाषणात काळे म्हणाले, संमेलनाच्या निमित्ताने विविध विषयांवर भाष्य झाले. समीक्षा, चर्चा, परिसंवाद रंगले, सभागृहाबाहेर ची चर्चा मुक्त चर्चा घडल्या. एकंदरीत या संमेलनाने सर्वसामान्यांना सामाजिक आणि वाड़मयीन क्षेत्राचा आनंद मिळवून दिला".
समारोपाच्या भाषणात काळे यांनी सबनीस यांनी सोपवलेल्या सत्याचाही ऊल्लेख केला, "माझ्याकडे अध्यक्षीय सूत्रे सोपवताना सबनीस म्हणाले होते की सुत्र नाही सत्य सोपवत आहे, त्याचा अंतर्मुख होउन विचार करतोय. पण सत्यासाठी गांधींसारख्या गोळ्या झेलायला लागतात. पानसरे, दाभोलकर यांना त्या झेलव्या लागल्या. त्यामुळे मी सत्य नाही स्वीकारत, पन त्याकडे अंतर्मुख होऊ न बघतो. असे अक्षयकुमार काळे म्हणाले. मी बुद्ध नाही चार्वाक नाही पण मी अभ्यासक आहे, असेही त्यांनी सांगितले.
काळे पुढे म्हणाले, "यश उगाच कुणालाही मिळत नाही, गीतेत त्याबाबत सविस्तर सांगितलं आहे. गीता काय सांगते याचा विचार करा, मग संमेलनातील सगळ्या बाजू समजतील."
"कुठल्याही गोष्टीसाठी लोकचेतना महत्त्वाची असते. ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळी ती दिसली. संमेलनाची उद्दिष्ट महत्त्वाची असतात, ती सगळीच साध्य होतील असे नाही, पण हे संमेलन त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या दिशेने गेले." असेही काळे यांनी पुढे सांगितले. तसेच संमेलनाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले.
स्थानिक प्रतिभेचा अनुषेश भरून निघाला - जोशी
यंदाचे मराठी साहित्य संमेलन सर्व बाबतीत वेगळे ठरले आहे. संमेलनातील स्थानिक प्रतिभेचा अनुशेष येथे भरून निघाला, असे साहित्य परिषदेचे अध्यक्ष जोशी यांनी सांगितले.
ते म्हणाले, हे गर्दीचे नव्हे तर दर्दींचे संमेलन ठरले, परिसंवादांना उपस्थितांनी दाद दिली. त्या अनुशंगाने हे संमेलन नवा पायंडा पाडणारे ठरले. अशा संमेलनाला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांना केले.
२७ गावांच्या ठरावाला केडीएमसीच्या महापौरांचा विरोध
पु. भा. भावे साहित्यनगरी डोंबिवली, दि. ५ - साहित्य संमेलनात करण्यात येणा-या ठरावांचे वाचन सुरू असताना कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या ठरावास विरोध केला. यावेळी देवळेकरांनी विरोध दर्शवल्यावर राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी या प्रस्तावास समर्थन दिले. अखेर परिषदेचे अध्यक्ष जोशी यांनी समर्थन आणि विरोध दोन्ही बाबी ठरावाला जोडून सरकारकडे पाठवला जाईल. असे सांगून हा विषय मिटवला.
बोलीभाषांना दिलेला मान हे या संमेलनाचे वेगळेपण
९०व्या साहित्य संमेलनाच्या यजमानपदाच्या निमित्ताने पु.भा. भावे आणि शं. ना. नवरे यांच्या नगरीला मान मिळाला आहे. राज्यातील बोलीभाषांना संमेलनाने दिलेले स्थान हे या संमेलनाचे वेगळेपण, ठरले असे उद्गार ९०व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांनी काढले.
वझे यांनी यावेळी संमेलनाच्या आयोजनात आलेल्या अडचणींचा उल्लेख करत मदत करणा-यांचे आभार मानले. ते म्हणाले, या संमेलनाचे आयोजन करताना आर्थिक टंचाई जाणवली, आचारसंहितेचा अडथळा आला. अनेक अडचणी आल्या. पण त्या सगळ्यांचा सामना करत आम्ही समारोपापर्यंत पोहोचलो.
मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे तसेच इतरांनी मदत केली. ठाणे, कल्याण डोंबिवली बदलापूर येथील साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी मदत केली. त्या सर्वांचे मी आभार मानतो, असे वझे म्हणाले