देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करण्याचा डाव, ३ वर्ष गप्प का?; समित कदमांचा अनिल देशमुखांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 12:00 PM2024-07-29T12:00:39+5:302024-07-29T12:01:48+5:30
अनिल देशमुखांनी समित कदम यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांचे आणि फडणवीसांचे जवळचे संबंध आहेत असा आरोप केला.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करण्याचा विरोधकांचा हा डाव आहे. गडकरींबाबतचा आरोप फेल झाल्यानं आता हे आरोप सुरू केलेत. मागील ३ वर्ष गप्प का होते असा सवाल करत समित कदम यांनी अनिल देशमुखांनी लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
देशमुखांच्या आरोपांवर समित कदम म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना पाडण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून होतोय असा आरोप केला होता मात्र ते यशस्वी झालं नाही. त्यामुळे आता हे आरोप करणं सुरू केले आहे. अनिल देशमुखांच्या आरोपांकडे फारसं गांभीर्याने बघत नाही. देशमुख यांनी काय आरोप करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मला जी म्हणायचं आहे ते मी स्पष्ट केलंय असं त्यांनी सांगितले. लोकमत डॉट कॉमला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशमुखांचे आरोप फेटाळले.
तसेच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडे दुसरे काही मुद्दे नाहीत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन करायची, गडकरींचा मुद्दा अपयशी ठरला त्यामुळे आता हे सुरू आहे. मी अनिल देशमुखांना भेटलो हे आधीच मान्य केले आहे. माझे फोटो जे फेसबुक, इन्स्टाग्रामवर आहेत तेच देशमुखांनी दाखवले त्यात काही वेगळे नाही. माझे फोटो सर्वच नेत्यांसोबत आहेत. त्यांच्या नेत्यांनाही मी भेटलो आहे. या गोष्टीला ३ वर्ष झाले, जेलमधून तुम्हाला बाहेर पडून २ वर्ष झाली, मग तुम्ही इतके दिवस गप्प का होता असा सवालही समित कदम यांनी अनिल देशमुखांना केला आहे.
दरम्यान, मी जनसुराज्य पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. जेव्हा आम्ही एनडीएचे घटक पक्ष झालो, वेगवेगळ्या बैठकीत आम्हाला निमंत्रण दिलं जातं, तेव्हा बैठकीला आम्हाला बोलावलं जातं, तेव्हा देवेंद्र फडणवीस असो वा सर्वच नेत्यांची भेट होते. मी घटक पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. त्यामुळे सर्व नेत्यांसोबत माझा परिचय आहे. अनिल देशमुखांसोबत माझी ओळख ते अन्न नागरी पुरवठा मंत्री असल्यापासून आहे. हे फोटो दाखवणे त्यावर चर्चा करणं याला अर्थ नाही असंही समित कदम यांनी म्हटलं.
काय होते अनिल देशमुखांचे आरोप?
समित कदम देवेंद्र फडणवीसांच्या इतका जवळचा माणूस आहे त्यामुळे सरकारने त्याला वाय सुरक्षा दिली. मिरज, सांगली भागात चौकशी केली तर समित कदम आणि फडणवीसांचे काय संबंध हे कुणीही सांगितले. माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. केवळ उद्धव ठाकरे, अजित पवार नाहीत तर त्यांची मुले आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्यावरही आरोप करायला सांगितले. राजकीय नेत्यांच्या मुलाला खोट्या आरोपात अडकवता येईल याप्रकारचा प्रयत्न ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला असा आरोप अनिल देशमुखांनी केला होता.