मिरचीपूड टाकून साडेअकरा लाख लुटले
By admin | Published: July 28, 2016 01:16 AM2016-07-28T01:16:13+5:302016-07-28T01:16:13+5:30
पुण्यातील व्यापाऱ्याने निपाणीतील व्यापाऱ्याला देण्यासाठी पाठविलेली साडेअकरा लाखांची रोकड कामगारांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्यात आली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय
कऱ्हाड (सातारा) : पुण्यातील व्यापाऱ्याने निपाणीतील व्यापाऱ्याला देण्यासाठी पाठविलेली साडेअकरा लाखांची रोकड कामगारांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्यात आली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठार (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, चोरट्यांनी पळवून नेलेली जीप कासेगावच्या हद्दीत बेवारस आढळली असून, पोलिसांनी ती जप्त केली आहे.
याबाबत जगदीश जेठाराम बिश्नोई (रा. टिंबर मार्केटनजीक, पुणे) यांनी कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या बाडनेर जिल्ह्यातील जगदीश बिश्नोई हा सध्या प्रकाश घाशी यांच्याकडे चालक म्हणून काम करतो. घाशी यांनी सांगितल्यानुसार जगदीश आणि त्याचा मित्र राजेश चौधरी पिकअप जीपमधून रोकड घेऊन निघाले होते. वाठारजवळ आल्यानंतर जगदीशला झोप येऊ लागली. त्यामुळे त्याने जीप थांबवून राजेशला तू गाडी चालव, असे सांगितले. राजेश जागा झाल्यानंतर जगदीश जीपमधून खाली उतरला. तो बाजूस लघुशंकेसाठी गेला असताना दुचाकीवरून तिघे जण त्या ठिकाणी आले. त्यांनी जगदीशला धक्काबुक्की केली. तसेच त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. जगदीश आरडाओरडा करीत असतानाच दोघे जण जीपच्या दिशेने गेले. त्यांनी क्लीनरच्या बाजूस बसलेल्या राजेशच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याला जीपमधून बाहेर ओढले. जगदीश व राजेश आरडाओरडा करीत असताना दोघांनी जीप चालू करून कोल्हापूरच्या दिशेने पोबारा केला. तर एक जण दुचाकीवरून तेथून निघून गेला. चोरट्यांनी जीपमधील साडेअकरा लाखांची रोकड लंपास करून जीप तेथून सोडून दिली होती. (वार्ताहर)
महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेच्या हाती !
पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनीही घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट, उपनिरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह पथक कऱ्हाडात दाखल झाले आहे. काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.