दाखल्याच्या नावाखाली एजंटकडून लूट
By Admin | Published: October 19, 2016 03:16 AM2016-10-19T03:16:28+5:302016-10-19T03:16:28+5:30
पनवेल तहसीलदार कार्यालयासमोर बसलेल्या एजंटकडून दाखल्यांसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असून विद्यार्थी व पालकांची लूट सुरू आहे.
मयूर तांबडे,
पनवेल- पनवेल तहसीलदार कार्यालयासमोर बसलेल्या एजंटकडून दाखल्यांसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असून विद्यार्थी व पालकांची लूट सुरू आहे. दाखल्यांसाठी प्रत्येकी ५०० रुपये आकारले जात आहेत.
पनवेल तहसीलदार कार्यालयात दाखले, शासकीय कामे करण्यासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी असते. कार्यालयासमोर बसलेले एजंट दाखल्याच्या नावाखाली नागरिकांकडून जास्त पैसे उकळत आहेत. याबाबतच्या अनेक तक्र ारी तहसील विभागाकडे करण्यात आल्या आहेत. सोमवारी नीलम गुप्ता ही महिला निवासी दाखला काढण्यासाठी आली होती. यावेळी एजंटने दाखला काढण्यासाठी पाचशे रु पये खर्च येईल, असे नूर नामक एजंटने सांगितले. एका दाखल्यासाठी एवढा खर्च सांगितल्यावर नीलम यांनी दाखला न काढण्याचे ठरविले व त्यांनी सेतू केंद्रात जाऊन दाखला काढण्याचा अर्ज विकत घेतला व स्वत:च दाखला काढण्यास सुरुवात केली. त्यासाठी केवळ ५० रुपये खर्च आल्याचे नीलम यांनी सांगितले.
तहसील कार्यालयाबाहेरील एजंटकडून नागरिकांची लूट सुरू असून हे प्रकार थांबविण्यात यावे, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. हे एजंट रस्त्यावरील जागा अडवत असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
प्रवेश प्रक्रिया, नोकरभरतीसाठी आवश्यक दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे. वारंवार हेलपाटे मारावे लागू नये, म्हणून काही जण हे शुल्क भरतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अशा एजंटवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
मंगळवारी सर्व एजंटांना तहसील कार्यालयात बोलावले होते. समोर बसलेल्या एजंटना बुधवारी, सायंकाळी ५ वाजेपर्यंत जागा खाली करण्यास सांगितले आहे. दोन दिवसांनी येथे एकही एजंट दिसणार नाही.
- दीपक आकडे,
तहसीलदार, पनवेल