कारखान्यांकडून शेतकऱ्यांची लूट
By Admin | Published: October 26, 2016 03:16 AM2016-10-26T03:16:50+5:302016-10-26T03:16:50+5:30
खताच्या नावाखाली जणू माती विकणाऱ्या दुय्यम मिश्र खतांचे ५४४ पैकी तब्बल ५०८ नमुने रासायनिक प्रयोगशाळेने बाद ठरविले आहेत. त्यामुळे या खतांची गुणवत्ता
- राजेश निस्ताने, यवतमाळ
खताच्या नावाखाली जणू माती विकणाऱ्या दुय्यम मिश्र खतांचे ५४४ पैकी तब्बल ५०८ नमुने रासायनिक प्रयोगशाळेने बाद ठरविले आहेत. त्यामुळे या खतांची गुणवत्ता नसल्याचे सिद्ध झाले असून त्याचे उत्पादन करणाऱ्या राज्यातील १३४ कारखान्यांचे परवाना नूतनीकरण करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कृषी विभागाने जुलै-आॅगस्टमध्ये राज्यभर मोहीम राबवून दुय्यम मिश्र खताचे तब्बल ५४४ नमुने घेतले. ते प्रयोगशाळांमध्ये तपासणीला पाठविण्यात आले. यापैकी ५४१ नमुन्यांचे अहवाल कृषी आयुक्तालयाला प्राप्त झाले आहेत. यातील तब्बल ५०८ नमुन्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. मुळात या कारखान्यांना दिलेले परवानेच चुकीचे होते, ही बाबसुद्धा या अहवालांनी अधोरेखित केली.
सखोल चौकशी करा
केंद्राला मिश्र खत मान्य नसताना राज्यात काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात चक्क दुय्यम मिश्र खत कारखान्यांना परवाने दिले गेले. देशात केवळ महाराष्ट्रात हे परवाने देण्यात आले आहेत. या कारखान्यांनी हे खत राज्यातील शेतकऱ्यांच्या माथी मारून खुलेआम लूट केली. याला जबाबदार असलेल्या कृषी आयुक्तालयातील गुणवत्ता नियंत्रण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
- अहवाल नकारात्मक आल्याने कृषी आयुक्तालयाने संबंधित कारखान्यांना नोटीस बजावून कारवाईची तयारी चालविली आहे. हे दर्जाहीन खत विकत घेतलेल्या हजारो शेतकऱ्यांची या कंपन्यांनी फसवणूक केली असून त्यांना पुन्हा मिश्र खतनिर्मितीची परवानगी देऊ नये, अशी मागणी कृषीतज्ज्ञांमधून होत आहे.
अशी आहे नमुन्यांची स्थिती
विभाग घेतलेले नमुनेफेल नमुने
पुणे १०२ ८९
नाशिक ६० ४८
औरंगाबाद ९४ ९४
अमरावती १५९ १४९
कोल्हापूर १२९ १२८
एकूण : ५४४ ५०८
राज्यातील कारखाने
विभागसंख्या
ठाणे ०२
पुणे ३१
नाशिक २२
कोल्हापूर ४६
औरंगाबाद १०
लातूर १२
अमरावती ०८
नागपूर ०३
एकूण १३४