नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे योजना नाही : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:39 AM2018-03-01T03:39:51+5:302018-03-01T03:39:51+5:30
साडेअकरा हजार कोटींचा घोटाळा करून पळालेल्या नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
मुंबई : साडेअकरा हजार कोटींचा घोटाळा करून पळालेल्या नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
आझाद मैदान येथील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चात ते बोलत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातही हल्लाबोल यात्रा काढणार असल्याचे सांगून पवार म्हणाले, पीएनबी घोटाळ्यामुळे आता उद्योग सुरू करण्यासाठी जर युवक बँकेत गेले तर त्यांना कर्ज दिले जात नाही. सध्या रेशन दुकानात गहू, तांदूळ देण्याऐवजी मका देऊ लागले आहेत. बाहेरच्या देशात मका हे पशुखाद्य म्हणून वापरले जाते. जनतेला जर नीट अन्नधान्य पुरवता येत नसेल तर सत्तेत राहून सरकारचा काय उपयोग?
देशात महागाई वाढली आहे, संसार चालवणे कठीण झाले आहे. कारखाने बंद होऊन रोजगार मिळेनासे झाले आहेत. कामगार वर्गावर अन्याय होत आहे. हे दूर करण्याची जबाबदारी ज्यांची होती ते असफल ठरले आहेत. त्यामुळे आज लोक म्हणायला लागले आहेत की, आम्हाला अच्छे दिन नको, पूर्वीचे दिवस परत द्या, असा टोलाही पवार यांनी लगावला.
देशात परिवर्तनाची गरज आहे. निवडणुकांमध्ये पवार साहेबांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे सूचक विधान ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले. आ. जयंत पाटील यांनीही सरकारच्या धोरणावर टीका केली. विधान सभेचे सभापती दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा.मजिद मेमन, नवाब मलिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
तर बकासूराचा रथ घेऊन फिरू : मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्ष आहे की नाही अशी चिंता अनेकांना होती. पण शरद पवारांनी या आंदोलनामार्फत आपल्या पाठीवर थाप दिली आहे, असे सांगत सचिन अहिर यांनी अधिवेशाच्या काळात मुंबईत धडकलेला हा पहिला विराट मोर्चा आहे असे नमूद केले. ते म्हणाले,‘ आशिष शेलारांच्या माध्यमातून जो गरीब रथ फिरतोय त्यातून किती गरीबी दूर केली हे सांगावे, मुंबईचे विकासाचे किती प्रश्न सोडवले, याचे उत्तर त्यांनी द्यावे अन्यथा राष्ट्रवादी पक्ष बकासूराचा रथ घेऊन मुंबईत जाणार आहे. मुंबइ संदर्भात या सरकारच्या योजना कशा फसव्या आहेत, हे आम्ही दाखवणार आहोत.