‘लोकमत’च्या बातमीची पंतप्रधानांकडून दखल, मुख्यमंत्र्यांकडून टि्वट; पर्यावरण रक्षकांना प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 05:23 AM2017-09-20T05:23:44+5:302017-09-20T10:50:30+5:30
भन्नाट कल्पना असलेल्या ‘कोल्हापुरातील झाडांची भिशी’ या ‘लोकमत’च्या बातमीची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विशेष दखल घेतली. त्यांनी ही बातमी टि्वट करून पर्यावरण रक्षण करणा-यांना प्रोत्साहन दिले आहे.
कोल्हापूर : भन्नाट कल्पना असलेल्या ‘कोल्हापुरातील झाडांची भिशी’ या ‘लोकमत’च्या बातमीची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विशेष दखल घेतली. त्यांनी ही बातमी टि्वट करून पर्यावरण रक्षण करणा-यांना प्रोत्साहन दिले आहे.
पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल... म्हणून काही कोल्हापूरकरांनी ‘ग्रीन व्हिजन व्हॉट्सअॅप ग्रुप’च्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांपासून ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम राबविला आहे.
त्याची माहिती ‘लोकमत’ने रविवारी प्रसिद्ध केली होती. ही बातमी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट केली आहे. त्यानंतर देशभरातील अनेकांनी टि्वटरवर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यातील काहींनी ही बातमी फेसबुक, व्हॉटस्अॅप, आदी सोशल मीडियाद्वारे देखील शेअर केली.
भिशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते ठरावीक व्यक्तींमध्ये होणारे छोट्या स्वरूपातील आर्थिक व्यवहार. मात्र, कोल्हापुरातील ग्रीन व्हिजन व्हॉट्स अॅप ग्रुपच्या सदस्यांनी ‘झाडांची भिशी’ सुरू करून गेल्या चार महिन्यांत शहरातील विविध ठिकाणी सुमारे चारशे झाडे लावली आहेत.
शहरातील डॉक्टर, हॉटेल व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी आणि काही सामाजिक संस्थांचे प्रमुख अशा ४५ जणांचा ग्रीन व्हिजन व्हॉट्स अॅप ग्रुप व्यावसायिक अवनिश जैन यांनी सुरू केला. या ग्रुपसमोर जैन यांनी ‘झाडांची भिशी’ या उपक्रमाची संकल्पना मांडली. त्याला सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. जूनमध्ये या ग्रुपने उपक्रमाची प्रत्यक्षात सुरुवात केली. यानंतर आतापर्यंत शहरातील राजाराम महाविद्यालय ते सायबर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते धैर्यप्रसाद हॉल, विक्रम हायस्कूल व डॉ. झाकीर हुसेन शाळेचा परिसर, आदी ठिकाणी सुमारे चारशे झाडे लावली आहेत. आॅक्टोबरअखेर पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प आहे.
अशी आहे भिशीची संकल्पना
दरमहा विशिष्ट रक्कम या ग्रुपच्या प्रमुखांकडे सदस्य जमा करतात. महिनाअखेरीस भिशीचे सदस्य एकत्र येतात. या वेळी चिठ्ठी टाकून दोन भाग्यवान सदस्यांना भिशीची रक्कम प्रदान करण्यात येते. हे सदस्य या रकमेतून रोपे आणि ट्री-गार्ड खरेदी करतात. शिवाय त्यांनी
सुचविलेल्या ठिकाणी सर्व सदस्य एकत्रितपणे वृक्षारोपण करतात. देखभालीची जबाबदारीही या सदस्यांची असते आणि त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जातो.
वृक्षारोपणासह देखभालही
काही महिन्यांपूर्वी सोलापूरमधील एक व्हॉट्स अॅप ग्रुप पर्यावरण रक्षणासाठी या भिशीच्या पद्धतीने वृक्षारोपण करीत असल्याचे वाचनात आले. त्यावरुन ही कल्पना सुचली. केवळ रोपे लावली म्हणजे काम झाले असे नाही, तर ती जगविणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आम्ही लावलेल्या झाडांची देखभालही करतो.
- अवनीश जैन, प्रमुख, ग्रीन व्हिजन ग्रुप
कोल्हापुरात 'झाडांची भिशी' pic.twitter.com/lPcx8HeOOg
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 18, 2017