नेहरू मेमोरियल काँग्रेसमुक्त; शहांच्या एंट्रीनंतर तीन काँग्रेस नेते बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 11:05 AM2019-11-06T11:05:08+5:302019-11-06T11:36:50+5:30
नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीची पुनर्रचना; तीन काँग्रेस नेत्यांचा दाखवला घरचा रस्ता
नवी दिल्ली: नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीच्या (एनएमएमएल) समितीची मोदी सरकारकडून पुनर्रचना करण्यात आली आहे. सांस्कृतिक मंत्रालयाकडून याविषयीचा निर्णय घेण्यात आला. एनएमएमएलची पुनर्रचना करताना सांस्कृतिक मंत्रालयानं काँग्रेस नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. एनएमएमएलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेस नेत्यांच्या जागी गीतकार प्रसून जोशी, टीव्ही पत्रकार रजत शर्मा, लेखक अनिर्बान गांगुली यांची निवड करण्यात आली आहे. यावरुन काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीच्या समितीमध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, करण सिंह आणि जयराम रमेश यांचा समावेश होता. मात्र आता त्यांना वगळण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी या समितीचे अध्यक्ष असून उपाध्यक्षपदाची धुरा राजनाथ सिंह यांच्या खांद्यावर आहे. तर अन्य सदस्यांमध्ये सचिदानंद जोशी, शिक्षातज्ज्ञ कपिल कपूर, वैदिक आणि बुद्धिस्ट विचारवंत लोकेश चंद्र, शिक्षातज्ज्ञ मकरंद परांजपे, किशोर मकवाना, कमलेश जोशीपुरा आणि रिजवान कादरी यांचा समावेश आहे. उदारमतवादी व्यक्तीमत्त्वांना नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी समितीत स्थान देण्यात न आल्याची टीका यावरुन काँग्रेसनं केली आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या स्मृतीप्रित्यर्थ नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीची उभारणी करण्यात आली. या समितीत मोदी, शहांसोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचादेखील समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत अनेकदा नेहरूंच्या परदेश धोरणांवर टीका केली आहे. यावरूनही काँग्रेस आणि भाजपामध्ये अनेकदा संघर्ष झाला आहे.