'माणसांपेक्षा मोदींना गाय-बैलांची चिंता जास्त'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 10:57 PM2019-07-21T22:57:41+5:302019-07-21T22:59:43+5:30
समाजवादी पार्टीच्या सभेत अबू आझमींची टीका
अकोला : रेल्वे आणि एसटीमध्ये माणसांना बसायला जागा नाही. गर्दी करून लोक दररोज प्रवास करीत आहे. त्यांची कुणाला चिंता नाही. मात्र गायबैलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होते. माणसांपेक्षा मोदींना गाय-बैलांची चिंता जास्त आहे. गाय-बैलांची ऐवढीच चिंता असेल तर बजेटमध्ये तशी तरतूद करा. त्यांना जगवण्यासाठी उपाययोजना करा, असे आवाहन समाजवादी पार्टीचे नेते खासदार अबू आसिम आजमी यांनी केले. अकोल्यातील खुले नाट्यगृहात रविवारी रात्री आयोजित समाजवादी पार्टीच्या देश बचाओ-संविधान बचाओच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
ज्या मुस्लिमांनी ८०० वर्ष सत्ता गाजवली, त्यांना गद्दार ठरविले जात आहे. स्वातंत्र्य चळवळीत सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांसोबत लढा देत रक्त वाहणाऱ्या मुस्लिमांसोबत दुजाभाव केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ताज महल, लाल किल्ला सोडून धर्म मानणाऱ्यांनी मुस्लिमांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तान निवडला आणि सर्वधर्म मानणाऱ्या मुस्लिमांनी हिंदुस्तान निवडला. त्यामुळे हा देश कुणा एकाचा नाही, सर्वांचाच आहे, असे स्पष्ट करत आज देशात अनेक ठिकाणी मुस्लिमांना एकाकी गाठून बळजबरीने त्यांच्या तोंडून जय श्रीरामचे नारे वदवून घेतले जात आहे. मुस्लिमांना ठार मारले जात आहे. बनावट आरोपांमध्ये त्यांना अडकवले जात आहे असा आरोपही त्यांनी केला.