‘मोदी म्हणाले, हरिभाऊ कुणालाही काही सांगू नका’; मराठवाड्याला दुसऱ्यांदा राज्यपालपदाची संधी
By विकास राऊत | Published: July 29, 2024 06:18 AM2024-07-29T06:18:13+5:302024-07-29T06:18:36+5:30
राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दोन दिवसांतील घडामोडींचे आश्चर्यकारक अनुभव सांगितले.
विकास राऊत, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २७ जुलै रोजी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी फोन आला, ते म्हणाले, ‘हरिभाऊ तुम्हाला महाराष्ट्राबाहेर पाठवायचे आहे, तयार राहा, कुणालाही काहीही सांगू नका. बाकी काय चालले आहे?’. मी म्हणालो ‘व्यवस्थित आहे’ एवढे बोलून त्यांनी फोन ठेवला. परंतु, मी थोडा वेळ संभ्रमात पडलो, त्यानंतर पूर्ण दिवस मतदारसंघातील कामांत गेला. मध्यरात्रीनंतर केंद्र शासनाने माझी राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्याचे मला कार्यकर्त्याने कळविले. तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. परंतु, मोदींनी सकाळी फोनवर जे सांगितले होते, त्याचा संदर्भ रात्री लागला. राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर आ. हरिभाऊ बागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दोन दिवसांतील घडामोडींचे आश्चर्यकारक अनुभव सांगितले.
बागडे म्हणाले, ‘माझ्या मनातही नव्हते की, असा काही निर्णय होईल. रविवारी सकाळपासून फुलंब्रीत पूर्ण दिवस गेला, अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली’. पक्ष स्थापनेपासून एकनिष्ठ राहिलात, त्याचे हे फळ आहे काय, यावर आ. बागडे म्हणाले, ‘१९८० मध्ये भाजप स्थापन झाल्यापासून पक्षाचे काम करीत आहे. त्यापूर्वी जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. १९६७ सालापासून सर्व निवडणुकीत सहभागी आहे. भाजपने विविध पदांवर काम करण्याची संधी दिली.
आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष पदावर काम केले. कार्यकर्ता म्हणून जे सांगितले ते काम केले. त्यामुळे पक्ष, राज्य आणि केंद्र शासनाने या पदावर काम करण्याची संधी दिली. संघाचा जिल्हा पदाधिकारी म्हणून देखील काम केले. जनसंघातही अनेक वर्ष काम केले. संघ, जनसंघ, भाजपमधील काम करण्याची पद्धतीची माहिती आहे. किसान संघ, सहकार भारतीमध्ये पहिल्या कार्यकारिणीत होतो.
शपथविधी कधी होणार...
२९ जुलै रोजी मुंबईला जाणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, तेथेच राजस्थान राजभवनमधील अधिकारी येतील. त्यांच्याशी चर्चा होईल. त्यानंतर पुढील कार्यक्रम काय असेल ते कळेल. शपथविधीबाबत अजून काही माहिती नाही, असे बागडे म्हणाले.
दुसरे राज्यपाल...
मराठवाड्यात यापूर्वी शिवराज पाटील-चाकूरकर यांची २०१० साली पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी आ. बागडे यांच्या रूपाने विभागाला घटनात्मक अशा राज्यपालपदावर नियुक्ती मिळण्याची संधी मिळाली आहे.