मोदी केवळ २ तासच झोपतात, आता झोपच लागू नये यासाठी प्रयोग करताहेत- चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:32 AM2022-03-21T11:32:40+5:302022-03-21T11:32:51+5:30
चोवीस तास जागं राहून देशासाठी काम करता यावं म्हणून मोदींकडून प्रयोग सुरू; पाटील यांचा दावा
कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातून केवळ दोनच तास झोपतात. झोपेची गरजच भासू नये असा एक प्रयोग ते सध्या करत आहेत. त्यानंतर त्यांना देशासाठी २४ तास काम करता येईल, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी प्रचार करताना पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदी केवळ दोन तासच झोपत असल्याचा दावा पाटील यांनी केला. 'मोदी दिवसातले २२ तास काम करतात. आता ते असा प्रयोग करतात ज्यानं त्यांना झोपण्याचीच गरज भासणार नाही,' असं पाटील म्हणाले. 'झोपेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदींचे प्रयत्न सुरू आहेत. देशासाठी २४ तास काम करता यावं यासाठी मोदींचे हे प्रयत्न सुरू आहेत,' असं पाटील यांना भाजप कार्यकर्त्यांना सांगितलं.
मोदी एक मिनिटंही वाया घालवत नाहीत. ते अतिशय कौशल्यानं काम करतात. देशात कोणत्याही पक्षात घडत असलेल्या घडामोडी त्यांना माहीत असतात. मोदी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सकाळी ६ वाजता फोन करतात. मंत्री साडे पाच वाजल्यापासूनच मोदींच्या फोनची वाट पाहत असतात, असं म्हणत पाटील यांनी मोदींच्या कार्यक्षमतेची माहिती कार्यकर्त्यांना दिली.