...म्हणून पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा ठरला वेगळा अन् विशेष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 10:59 AM2020-11-29T10:59:58+5:302020-11-29T11:01:17+5:30
पंतप्रधानांचा मोदींचा 'अराजकीय' दौरा; दौऱ्यातून पक्ष आणि नेते ‘वजा’
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा पूर्णपणे ‘अराजकीय’ ठरला. विमानतळावर स्वागताला जाण्याची राजकीय पदाधिकाऱ्यांची परंपरा मोडीत निघाली. पंतप्रधान कार्यालयाकडूनही याबाबत ‘प्रोटोकॉल’ पाठविण्यात आलेला नव्हता. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही या स्वागताला जाता आले नाही. मात्र, खासदारांसह अनेकांनी मोदींच्या स्वागताचे जुने फोटो असलेले फलक शहरात झळकाविले. तर, बहुतांश पदाधिकारी व नेत्यांनी त्यांचे जुने फोटो सोशल मीडीयावर अपलोड करुन ‘व्हर्चुअल’ स्वागत केले.
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी पुण्यातील सिरम इन्सिट्यूटला भेट दिली. कोविड लसीची माहिती घेण्यासाठी आलेल्या मोदींच्या स्वागताला विमानतळावर विभागीय आयुक्त, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. एकही राजकीय नेता या स्वागताला उपस्थित नव्हता. याबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणाले, पुण्यामध्ये कोरोनावर लस तयार होते आहे. त्याची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान पुण्यात आले होते. ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कार्यकर्ते व नेत्यांनी मोदींनी ठरवलेल्या दौऱ्याच्या नियोजनाचा मान राखला. सोशल मिडीया आणि बॅनर लावत आपापल्या पद्धतीने स्वागत केले. यामध्ये गैर काही नाही.
मोदींनी दौ-यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, खासदार, आमदार यांपैकी कोणीही स्वागताला येऊ नये कळविले होते. स्वागताची ‘लाईनअप’ टाळण्याकरिता सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे भाजपाकडून पक्षीय पातळीवरही याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या. पक्षाचे नेते असलेले पंतप्रधान पुण्यात येताहेत म्हटल्यावर खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्या स्वागताचे जुने फोटो असलेले फलक शहरात लावले. तर, आमदार माधुरी मिसाळ यांचे मोदींना गणेश मूर्ती भेट देतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. यासोबतच काही पदाधिका-यांनीही त्यांचे जुनेच फोटो पोस्ट करत मोदींचे स्वागत असे मेसेज टाकले.
या संपूर्ण दौऱ्यामध्ये एकाही राजकीय नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला न भेटता मोदी दौरा पूर्ण करुन निघूनही गेले. यापूर्वी मोदी पुण्यात आले तेव्हा त्यांच्या भोवती राजकीय नेत्यांची मांदियाळी होती. परंतु, शनिवारचा दौरा पूर्णपणे अराजकीय ठरला.
पीएम ऑफिसकडून आमच्याकरिता प्रोटोकॉल नव्हता. दौऱ्याची रुपरेषा ठरलेली होती. त्याप्रमाणे सर्व वागले. यामध्ये राजकीय व्यक्तींना भेट घेता आली नाही हे खरे असले तरी कोरोनावरील लस हा महत्वाचा विषय आहे. पुण्यात लस तयार होत असल्याने पंतप्रधानांचा दौरा पुणेकरांना अभिमानास्पद आहे.
- मुरलीधर मोहोळ, महापौर
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा पूर्णपणे शासकीय दौरा होता. त्यामुळे पक्षाकडून स्वागताला जाण्याचा प्रश्नच येत नाही. संपुर्ण जगाचे लक्ष लागलेल्या लसीच्या पाहणीकरिता मोदी आले होते. त्यामुळे त्यामध्ये राजकीय व्यक्ती असणे अपेक्षितच नव्हते. पीएम कार्यालयाने घेतलेला निर्णय योग्य आहे.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा